गेल्या काही दिवसांपासून नामांकित इंग्रजी शाळेत प्रवेशावरून वाद निर्माण झाला होता. अखेर नामवंत शाळांची यादी आता आदिवासी विभागाने जाहीर केली आहे. या नामांकित इंग्रजी शाळांमध्ये आता शुल्कनिश्चिती करण्यात आली आहे. कोणत्याही शाळेला विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कमी किंवा जास्त पैसे दिले जाणार नाहीत. तर, आता शुल्कनिश्चिती करून शाळेचा दर्जा ठरवून निधी देण्यात येणार आहे. त्यामुळे आदिवासी विकास विभागाकडे कोणत्याही शाळेचा प्रस्ताव पाठविण्यावरही आळा बसणार आहे. नागपूर आदिवासी अपर आयुक्त कार्यालयासमोर काही आदिवासी संघटनांनी आंदोलन केले होते. नामांकित शाळांची यादी तयार न झाल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यास विलंब होऊ शकतो, असा आरोप संघटनांनी केला होता. दोन दिवसात यादी जाहीर करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार आता ठाणे, नाशिक, अमरावती आणि नागपूर अपर आदिवासी विभागातील नामांकित शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. २०१६-१७ या शैक्षणिक सत्रासाठी पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांना तातडीने प्रवेश मिळणार आहे. नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची जबाबदारी संबंधित शाळांची आहे. या सर्व शाळांमध्ये ५० ते ६०० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट