म. टा. प्रतिनिधी, नागपूर
मेट्रो शहरांमध्ये मुलांसोबत मुलींमध्येही उशिराने विवाह करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रजननाची वयोमर्यादा वाढून वंध्यत्वाची जोखीमही वाढत आहे. शहरांमध्ये पस्तिशीनंतर विवाह करणाऱ्या शेकडा शंभर जोडप्यांमध्ये किमान १५ ते २० जोडपी विविध कारणांमुळे वंध्यत्वाच्या उंबरठ्यावर आहेत, अशी धक्कादायक माहिती डॉ. चैतन्य शेंबेकर यांनी गुरुवारी येथे दिली.
इंडियन सोसायटी ऑफ असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह शाखेतर्फे शहरात २३ व २४ जुलै रोजी वंध्यत्व निवारण परिषद आयोजित केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी साधलेल्या संवादात डॉ. शेंबेकर यांनी या ज्वलंत समस्येकडे लक्ष वेधले. पूर्वी वंध्यत्वात पुरुषांमधील शुक्राणूंची अपुरी संख्या हा वैद्यक शास्त्रासमोरचा चिंतेचे विषय होता. मात्र, आता आधुनिक जीवनशैलीत यात महिलांचेही प्रमाण वाढले आहे, असे नमूद करीत डॉ. शेंबेकर म्हणाले, 'अनेक गोष्टी वंध्यत्वाला जबाबदार असतात. साधारणपणे विवाहित जोडप्यांमध्ये पुरुषांमधील शुक्राणू आणि स्त्रियांमधील स्त्री बिजांड गरोदरपणात महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, आधुनिक जीवनशैलीत महिलांमध्येही करीअरच्या नादात उशिराने विवाह करण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम हा गरोदरपणावर होतो. जननप्रक्रियेतले दोष, अंतस्रावी गंथी, संप्रेरके हे गरोदरपणात महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, महिलांमध्ये वाढत्या वयोमानानुसार शरीरात होणारे अंतर्गत बदल हे गरोदरपणावर प्रभाव टाकतात. आधुनिक वैद्यकशास्त्राची मदत घेऊन वंध्यत्वाची जोखीम कमी करता येते. मात्र, त्यासाठी योग्यवेळी योग्य उपचार मिळणे आवश्यक असते. गरोदरपणात पुरुषांइतकीच स्त्रीची भूमिकादेखील महत्त्वाची असते. मेट्रो शहरातल्या तरुण स्त्रियांमध्ये उशिराने विवाह, आहारशैली, व्यसनाधीनता, ताण या गोष्टी वंध्यत्वाला जबाबदार ठरत आहेत. त्यामुळे शहरांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण हे आता पुरुष आणि स्त्रियांमध्ये समान आहे.'
--उद्यापासून दोन दिवसीय परिषद
शनिवारपासून होणाऱ्या या दोन दिवसीय वंध्यत्व निवारण परिषदेत प्रामुख्याने गर्भधारणा, गर्भचिकित्सा, दुर्बिणीद्वारे निदान आणि कृत्रिम गर्भधारणा या विषयावर सांगोपांग चर्चा होणार आहे. यात प्रामुख्याने डॉ. रिष्मा पै, डॉ. नंदिता पळशेटकर, डॉ. पद्मरेखा जिरगे या मार्गदर्शन करणार आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेतल्या चर्चासत्रांत अणू व गुणसूत्रांची भूमिका, प्रगत अचिक वैज्ञानिक तंत्राचा वापर, वंध्यत्वातले अडथळे, वैद्यकीय सहाय्यतेने गर्भधारणा, प्रजोत्पादन या विषयावर प्रकाश टाकला जाईल.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट