'शेतीची बकाल अवस्था कळूनही शेतकऱ्याच्या नरडीला गळफास लावणारे मागचे सरकार क्रूर होते. पण, यातून कुठलाही धडा न घेता जुन्याच सरकारच्या धोरणांचे अंधानुकरण करणारे आजचे सरकार बावळट आहे', अशा शब्दांत ज्येष्ठ शेतकरी नेते अमर हबीब यांनी बकालतेकडे वाटचाल करीत असलेल्या आजच्या देशाचे मार्मिक विश्लेषण येथे केले.
'शेतकरी या देशाचे नागरिक नाहीत का', या विषयावर जनमंचच्यावतीने शुक्रवारी शंकरनगरातील साई सभागृहात आयोजित जनसंवाद या कार्यक्रमात हबीब यांनी विद्यमान परिस्थितीवर बोलके भाष्य केले. शेतकरी नेते गजानन अमदाबादकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कुळकर्णी अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर जनमंचचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर, सल्लागार प्रा. शरद पाटील, अॅड. राजीव जगताप आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
जमिनीचे अधिकार नाकारणाऱ्या कायद्याच्या विळख्यातून सुटका झाल्याशिवाय शेतकऱ्याच्या मानेभोवतीचे गळफास सैल होणार नाहीत, असे नमूद करीत अमर हबीब म्हणाले, 'हुंड्यापायी केलेल्या आत्महत्या या हुंडाबळी म्हणून गणल्या जातात. मात्र, चुकीच्या सरकारी धोरणांमुळे शेतकऱ्यांनी संपविलेली जीवनयात्रा ही सरकारबळी ठरविली जात नाही, हे या देशाचे सर्वांत मोठे दुर्दैव आहे.
मागच्या सरकारने लादलेला जमीन सिलिंग कायदा, कापूस एकाधिकारशाही, ऊस झोन बंदीदेखील शेतीच्या जीवावर उठली. धोरणे चुकीची आहेत, हे माहिती असतानाही मागच्या सरकारने शेतकऱ्यांचे प्राण घेऊन क्रूर वागणूक दिली. आजचे सरकार त्याच धोरणांचे अंधानुकरण करीत बावळटपणा सिद्ध करीत आहे. मालमत्तेचा अधिकार काढून घेऊन या सरकारांनी शेतीची अवस्था बकाल केली आहे. घटनेने दिलेल्या या मूलभूत अधिकारावरच गदा आणली जात असतानाही त्यावर अवाक्षर न काढणाऱ्या विद्यमान सरकारलादेखील आता जाब विचारण्याची वेळ आली आहे. शेतीवर उदरनिर्वाह असणाऱ्या ६० टक्के लोकांची अवस्था जनावरांपेक्षाही वाईट झाली आहे. त्यामुळे कृषिप्रधान देश म्हणवून घेणेदेखील आता जड वाटू लागले आहे.'
अमदाबादकर म्हणाले, 'मातीत रक्त अटवून अन्न पिकवणारा शेतकरी आज मृत्युपंथाला लागला आहे. तरीही मूठभर नोकरदारांना याविषयी
जराही वैषम्य वाटत नाही. नोकरशाहीसाठी कर्जाच्या पायघड्या अंथरल्या जात आहेत. पण अन्न पिकवणाऱ्यांना साधा जगण्याचा अधिकारही नाही. शेतकऱ्याला पेरणे आले पण धोरणे समजली नाहीत. ही परिस्थिती बदलाची असेल तर शेतीशी नाळ असलेल्यांनी शेतकऱ्याचे हुंदके एकण्याची वेळ आता आली आहे.'
जनमंच ही चळवळ नव्हे, तर तळमळ आहे, असे गौरवोद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब कुळकर्णी यांनी काढले. आपले हक्क मिळविण्यासाठी सरकारला धारेवर धरण्याशिवाय पर्याय नाही, असेही ते म्हणाले. सुरुवातीला अॅड. किलोर यांनी प्रास्ताविकातून 'जनसंवादा'मागची भूमिका मांडली. विषमतेचे वास्तव आकडेवारीसह लक्षात आणून दिले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट