पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी मिर्झा हिमायत इनायत बेग याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशा राज्य सरकारने दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिकेची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेत बेगला नोटीस बजावली आहे. मुंबई हायकोर्टाने बॉम्बस्फोटात १७ नागरिकांच्या मृत्यूला बेग याला फाशी रद्द करून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
पुण्यातील जर्मन बेकरी येथे १३ फेब्रुवारी २०१० रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात १७ जण ठार तर ५८ जण जखमी झाले होते. हा स्फोट घडवून आणण्यात हिमायत बेग आणि यासिन भटकळ या दोन सीमीच्या दहशतवाद्यांचा समावेश असल्याचे एटीएसच्या तपासात स्पष्ट झाले. त्याला तिथे सोडून देणाऱ्या रिक्षाचालकानेही येरवडा कारागृहात झालेल्या ओळख परेडमध्ये हिमायत बेगला ओळखले होते. त्या सबळ पुराव्यांमुळेच पुण्यातील सत्र न्यायालयाने जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात दोषी मानून बेग याला फाशीची शिक्षा सुनाववली होती. त्या शिक्षेला बेग याने मुंबई हायकोर्टात आव्हान दिले होते. त्यासोबतच पुणे सत्र न्यायालयाने बेग याच्या फाशीवर शिक्कामोर्तब करण्याचा रेफरन्सही हायकोर्टात केला होता.
हायकोर्टाने सबळ पुराव्यांअभावी बेग याची बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याच्या कलम १६ (१) (अ) , १० (ब), १० (अ) १८ , २०, १३ ( १) (ब) १३ (२) भादंविच्या कलम १२० (ब) ३०२ व १२० ( ब) ३०७ , ४३५ आणि १२० (ब) १५३ ( अ) आणि विस्फोटक कायद्याच्या कलम ३ (ब) ४ (अ) ४ (ब) मधूनही मुक्तता केली.
बेग नागपूरच्या कारागृहात जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी हिमायत बेग हा नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने बाजावलेली नोटीस त्याला नागपुरातील कारागृहात देण्यात येईल. त्यासोबतच बेग हा त्याला सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेला देखील सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याची शक्यता आहे. त्यास्थितीत सरकार व बेग यांच्या याचिकांवर एकत्रित सुनावणी होण्याची शक्यता आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट