नागपूर : एकीकडे वनपर्यटनाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन विविध योजना राबवित आहे. दुसरीकडे विदर्भातील वनपर्यटनाचा उत्तम प्रयोग असलेल्या 'निसर्गायन'कडे जाणारा रस्ताच वन विभागाने खोदून ठेवला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याच गृहजिल्ह्यात हा प्रकार घडला आहे हे विशेष. राज्यात आणि केंद्रातही भाजपाचे सरकार असताना ज्यांच्या संदर्भात हा प्रकार घडला आहे ते 'निसर्गायन'चे संचालक; प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. राजन जयस्वाल संघपरिवारातील 'संस्कार भारती' या संघटनेच्या विदर्भ प्रांताच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळतात हे आणखी एक विशेष.
चंद्रपूर जिल्ह्यात नागपूर-गडचिरोली मार्गावर नागभीड येथे गावाबाहेर टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या आपल्या शेतात डॉ. जयस्वाल यांनी चार वर्षांपूर्वी 'निसर्गायन'ची निर्मिती केली. या 'निसर्गायन'च्या एका बाजूला उंच टेकडी आणि दुसरीकडे देव तलाव त्यामुळे पर्यटक, निसर्गप्रेमी, पक्षी निरीक्षक यांच्यासाठी निसर्गायन म्हणजे पर्वणी असते. जवळपास साडेसहा एकरात हा प्रकल्प आहे आणि पर्यटन महामंडळाशी संलग्नित आहे. अत्याधुनिक निवास व्यवस्थेसहच आतील बगिचे, धबधबा, वैशिष्ट्यपूर्ण वॉकिंग ट्रॅक, वॉच टॉवर पर्यटकांना येथे आकर्षित करतात. नक्षत्रवन-राशीवन-दिशावन-आमराई अशा विविध वनरचनांमुळे वृक्षप्रेमी पर्यटकांची 'निसर्गायन'ला पसंती असते. मात्र पंधरा दिवसांपूर्वी वनखात्याच्या कागदपत्रांमध्ये हा रस्ताच नसल्याचे कारण देत वन विभागाने तो तीन ठिकाणी कंबरभर खोदून ठेवला आणि आता रस्त्याने कुणी जाऊ नये म्हणून तेथे वृक्षारोपणही केले आहे.
प्रा. जयस्वाल यांच्या 'निसर्गायन'शिवाय अन्य कितीतरी लोकांची शेती या भागात आहे. देव तलाव आहे. नागभीड आणि परिसरातील लोक या देवतलावावर रक्षा विसर्जनासाठी येत असतात. मात्र वन विभागाच्या या 'कर्तृत्वा'मुळे आपल्यासह अनेकांसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे जयस्वाल यांनी 'मटा'ला सांगितले. हा रस्ता सुरू न झाल्यास संबंधित शेतकऱ्यांवर शेती पडित ठेवण्याची वेळ येणार आहे. शेकडो वर्षांपासून हा आमचा पारंपरिक पांदण रस्ता आहे, असा दावा डॉ. जयस्वाल यांनी केला. नागभीडवरून घोडाझरीला मुख्य रस्त्याने १०-१५ कि.मी. जावे लागते. मात्र आता वन विभागाने खोदलेल्या रस्त्याने घोडाझरी पक्त सात किमीवर पडते. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही 'निसर्गायन'ला भेट दिली होती व या पर्यटनस्थळाची प्रशंसा केली होती.
तर विधानभवनापुढे उपोषण हा रस्ता वन खात्याने पूर्ववत करून द्यावा अन्यथा, मुंबईत विधिमंडळापुढे सहकुटुंब आमरण उपोषण करण्याचा इशारा डॉ. जयस्वाल यांनी दिला आहे. माझ्या सामाजिक कामाचा या गोष्टींशी तसा संबंध नाही, असे डॉ. जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे. संस्कार भारतीच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यावर उपोषणाची वेळ येणार नाही असा आशावाद अनेकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, 'निसर्गायन'कडे जाणारा वहिवाटीचा रस्ता बंद करून सरकारला तिथे कदाचित हेलिकॉप्टर सेवा सुरू करायची असावी, असा जबर टोलाही 'परिवारा'तील एका ज्येष्ठ नेत्याने लगावला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट