टीबी वॉर्ड परिसरात १२ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या तरुणाला गुन्हेशाखा पोलिसांनी अटक केली आहे. नीतीश अनिल जैस्वाल (२५, रा. रामबाग कॉलनी) असे या आरोपीचे नाव असून तो इलेक्ट्रिक फिटींगची कामे करतो. या मुलीवर अत्याचार केल्यावर आपली मिशी काढून टाकणे तसेच इतर अन्य गोष्टींच्या आधारे नितीशने आपली ओळख लपविण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिस आयुक्त एस. पी. यादव यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
शिकवणी वर्गावरून परत येणाऱ्या या विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिच्याशी अनैसर्गिक कृत्य करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार इमामवाड्यातील टीबी वॉर्ड परिसरात बुधवारी रात्री उघडकीस आला होता. या घटनेने पीडित विद्यार्थिनीचे नातेवाईक व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये रोषाचे वातावरण होते. पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित शुक्रवारी शहरात होते. त्यांनीसुद्धा या प्रकरणाची माहिती घेऊन आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचे आदेश दिले होते. शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली. गुन्हेशाखेचे प्रभारी अतिरिक्त पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा, पोलिस उपनिरीक्षक सचिन लुले, पोलिस हवालदार बट्टुलाल पांडे, प्रकाश वानखेडे यांनी या आरोपीला अटक केली.
फेसबुक आणि तीच जुनी पद्धत
आजकाल गुन्ह्यांच्या तपासाकरिता फेसबुक, कॉल डिटेल रेकॉर्ड या बाबींचा वापर केला जातो. या प्रकरणातसुद्धा ही पद्धत वापरण्यात आली. परंतु, पोलिसांची जुनी आणि पारंपरिक पद्धतसुद्धा या प्रकरणाच्या तपासाकरिता फायद्याची ठरली. या घटनेनंतर पोलिसांनी या भागातील त्यांचे जवळपास सगळेच खबरे सक्रिय केले होते. यात इतर प्रकरणांतील आरोपींचा तसेच काही बदमाशांचाही समावेश असल्याचे बोलले जाते. शक्य त्या प्रत्येक ठिकाणाहून माहिती घेऊन नीतीशला त्याच्या वस्तीतूनच अटक करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी ओळखीतलाच असल्याची चर्चा सुरू होती. हा आरोपी पीडित मुलीच्या घरामागेच राहतो. त्यामुळे पीडित मुलगी आणि आरोपी एकमेकांना ओळखत असावेत, असा अंदाज बांधला जात आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट