काँग्रेस मनपात एकदा पुन्हा आक्रमक होणार आहे. प्रशासनाने दिलेले आश्वासन पाळले गेले नाहीत. शहरात विविध प्रकल्पांत घोळ सुरू असून, कारवाईसाठी प्रशासन टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने धडक देण्याचे ठरविले आहे.
शहरात सुरू असलेल्या अनेक प्रकल्पांत सत्तापक्षासह प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे. प्रकरणांचे पुरावे देऊनही कारवाई होत नाही. त्यामुळे आंदोलन करून वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधावे लागते आहे. जनतेच्या पैशांची अशी लूट काँग्रेस खपवून घेणार नाही. ओसीडब्ल्यू कंपनी पाणीदेयकावरून ग्राहकांना धमकावत आहे. वसुली न झाल्यास पाणीजोडणी तोडत आहे. जनतेत यावरून निराशा आली असून, पाणी कंत्राट रद्द करण्याची मागणी आहे. शहरातील रस्त्यांचीही अशीच अवस्था आहे. रस्ते उखडले आहेत. मनपाच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे. दोषी कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे व निष्काळजीपणामुळे काम करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. वंशनिमय कंपनीच्या भ्रष्टाचारावर कारवाईचे आश्वासन तत्कालीन महापौर प्रा. अनिल सोले यांनी दिले होते. ३० महिने उलटूनही आदेशाची अंमलबजावणी होत नाही. कंपनीचे संचालक राहिलेले अजय ढवंगळे यांनी आयुक्त व जनतेची फसवणूक केल्याचे सभागृहात सिद्ध झाले आहे. असाच प्रकार केबल डक्टप्रकरणी झाला. ५० कोटींचा दंड १२ लाखांत करण्यात आला. प्रकरण गुंडाळणाऱ्या गायकवाड या अभियंत्यावर कारवाई करण्यात येत नाही. घाटावर लाकूड पुरविणाऱ्या महेश ट्रेडिंग कंपनीने गैरव्यवहार केला आहे. लेखा परीक्षण अहवालात ही बाब पुढे आली. कंपनीचे संचालक नितीन फुके व महेश बारंगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. पावसाळ्यात हॉट मिक्स बंद असल्याने जेट पॅचरने खड्डे बुजविण्याचे काम करून डांबरीकरण करण्यात येत होते. पावसाळ्यातही हे काम करणे अनिवार्य आहे. मात्र, बोगस बिल काढून ते वटविण्यात आल्याचा आरोप आहे. मनपाच्या फुटाळा भागातील १० हजार चौरस फूट मोकळ्या जागेवर जेट पॅचर कंपनीने अवैधपणे ताबा करून अतिक्रमण केले आहे. या जागेवर टेकडीवरील भागातून सांडपाणी वाहत होते. मनपाने २.५० कोटी खर्चून संरक्षण भिंत उभारली. या निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप आहे. प्रस्तावाला कोणी मंजुरी दिली, असा सवाल उपस्थित करून या सर्वांची चौकशी करण्याची मागणीही काँग्रेसने केली आहे. तसेच मनपाच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
शहरातील कचरा उचलणारे कनक रिसोर्सेस नागरिक, भूखंडधारक व फ्लॅट स्कीमच्या धारकांकडून अवैध पैशांची वसुली करतात. कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना पैसे देते. तरीही, नागरिकांकडून वसुली करण्यात येते. नागरिकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागतो. याप्रकरणीही कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची मागणीही काँग्रेसने केली आहे.
तयारी सुरू
महापालिकेत सर्वच कामांत गैरव्यवहार होत असून, या सर्व बाबींचा जाब विचारण्यासाठी पुन्हा एकदा काँग्रेसने आयुक्तालयात धडक देण्याचे जय्यत तयारी सुरू केली आहे. प्रकल्प व त्यात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आणि काही प्रकरणांत गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन मनपा प्रशासनाने काँग्रेसला दिले होते. मात्र, ही आश्वासने पाळल्या गेलेली नाहीत, असे विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट