पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे पत्र लिहून नेर तालुक्यातील मारवाडी येथील एका शेतकरी पुत्राने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षी याच गावातील विशाल पवार या शेतकऱ्याने पालकमंत्र्यांच्या नावे पत्र लिहून आत्महत्या केली होती. गोपाल बाबाराव राठोड (२२) असे त्या शेतकरीपुत्राचे नाव आहे. बाबाराव यांच्याकडे वडिलोपार्जित तीन एकर शेत आहे. त्यांच्यावर बँकेचे कर्ज आहे. नेरमधील एका शिक्षकाने त्यांना शेळी पालनाचा व्यवसायही सुरू करून दिला होता. पण, सततच्या आर्थिक अडचणीमुळे गोपाल कंटाळला होता. यातूनच त्याने विष प्राशन केले. मार्गदर्शक शिक्षकाचे घर गाठले. ही बाब लक्षात येताच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
आत्महत्याग्रस्त गोपालचे प्रश्न...
क्रिकेटच्या टीममध्ये व्यावसायिक लोकांची मुले, व्हॉलिबॉलच्या टीममध्ये पैसेवाल्यांची मुले, ज्यांच्या कामामुळे हे लोक दोन वेळ जेवण जेवतात त्या शेतकऱ्याच्या मुलांनी काय करावे?
इंजिनीअरला प्राध्यापकांची मुले एक लाख रुपयांची फी शेतकरी भरू शकत नाही तर त्यांच्या मुलांनी काय करावे?
बँकेचे लोन व्यवसाय करण्यासाठी मागितले तर त्यांना संपत्ती गहाण हवी, ज्याच्याकडे संपत्ती नाही त्याने काय करावे?
वेतनधारी लोकांना महागाई भत्ता न मागता मिळतो. परंतु शेतकऱ्यांना भाव मागता मागता भावच कमी होतो.
भांडण दोघांचे आणि पोलिस स्टेशनला तक्रार चौघांची. बिना चौकशी पोलिस गुन्हे दाखल करतात हा कुठला नियम?
बेरोजगार मुले ऑटो चालवतात परंतु त्यांना पोलिस स्टेशनमध्ये हप्ते द्यावे लागतात, असे का?
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट