>>पंकज मोहरीर, चंद्रपूर
मी केवळ दहशतवादी, गुन्हेगारांविरोधातच लढणार असे नाही तर माओवादसंदर्भातील प्रकरण आले तरी वकीलपत्र स्वीकारणार, अशी भूमिका विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी मांडली आहे.
चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने कर्मवीर पुरस्कार व विविध स्पर्धा पुरस्कारांचे वितरण सोमवारी करण्यात आले. यानिमित्त अॅड. निकम चंद्रपुरात आले असता त्यांनी 'मटा'शी संवाद साधला. ते म्हणाले, आज देशापुढे अनेक प्रश्न, समस्या उभ्या आहेत. त्यात माओवाद ही सर्वात गंभीर आणि घातक समस्या आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार, आंध्र प्रदेश, छत्तीसगडप्रमाणे महाराष्ट्रातही हे गंभीर संकट आहे. गडचिरोलीत माओवादी कारवाया दिसून येतात. आजवर दहशतवादी गुन्हेगारांविरोधासोबत काही सामाजिक प्रकरणातून गुन्हेगारांविरोधात लढा दिला आहे. पण, तेवढ्यापुरतेच आपण मर्यादित नसून माओवादासंदर्भातील गुन्हेही लढणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिकारीबाबतचे गुन्हेही
लढू शकतो
काही अपवाद वगळता वाघ वा वन्यजीव घटनांत गुन्हेगाराला मोठी शिक्षा झालेली नाही. तशीही मोठ्या शिकारीबाबतची प्रकरणे आल्यास लढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारीचे उदात्तीकरण होता कामा नये, असे सांगत गुन्हेगाराला कायद्याची भीती ही वाटलीच पाहिजे, असे मतही अॅड. निकम यांनी व्यक्त केले.
-तर मोठा स्फोट होईल
मी जर अनेक प्रकरणातील आजवर समोर न आलेल्या घटनांचा उल्लेख केला तर तर मोठा स्फोट होईल. त्यामुळेच आत्मचरित्र लिहिण्याचा विचार नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
प्रसार माध्यमांचे महत्त्व अबाधितच
अलीकडे सोशल मीडियाचा झपाट्याने प्रसार होत आहे. प्रत्येकजण या माध्यमाशी जुळला आहे. सोशल मीडियामुळे प्रचलित प्रसार माध्यमांवर गदा येणार काय, अशी भीती माध्यमातील मंडळींमध्ये आहे. मात्र सोशल मीडियामुळे प्रसार माध्यमांवर कोणतेही बंधने येणार नाहीत. शिवाय प्रसार माध्यमांचे महत्वही कमी होणार नाही, असे मत अॅड. निकम यांनी व्यक्त केले. चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वरिष्ठ पत्रकार सुनील कुहीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान किशोर पोतनवार आणि वरोऱ्याचे ग. म. शेख उर्फ शेख गुरुजी यांना कर्मवीर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट