पावसाळ्याच्या दिवसात शेळ्या घेऊन जंगलात जावे लागते. वन्यप्राणी दिसून येतात. शुक्रवारी दुपारी ओढ्याजवळ असतानाच अचानक गुरगुरण्याचा आवाज आला. जवळ जावून पाहिले तर एक मोठा वाघ बसून होता. कुणीतरी त्याच्याकडे येत असल्याचे पाहताच तो सावध झाला. वगारीच्या (सुमारे चार फुट) आकाराचा तो होता. त्याने आमच्याकडे कटाक्ष टाकत डरकाळी फोडली. क्षणाचाही विलंब न लावता आम्ही गावाकडे धाव घेतली. गावात येवूनच थांबलो. सोनेगावच्या मालन पेंडे सांगत होत्या.
'जय'च्या वर्णनाला साजेसा तो वाघ असल्याची खात्री पटवून देत होत्या. विशेष म्हणजे, येथून सहा किमी अंतरावरील पुरकाबोडीच्या जंगलातही जय दिसून आल्याची चर्चा होती.
उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील 'जय' हा वाघ गेल्या काही महिन्यांपासून गायब आहे. त्याच्या शोधासाठी पथके गठीत करण्यात आली आहेत. पण, अजूनही त्याचा शोध लावण्यात वनविभागाला यश आलेले नाही. चिचाळ येथील माजी सरपंच मुनिश्वर काटेखाये हे लाखनीहून चिचाळ येथे कुटुंबीयांसह येत असताना पुरकाबोडी-तिर्री मार्गावर चार फुट उंचीचा पट्टेदार वाघ रस्त्याच्या कडेला दिसला. आजपर्यंत एवढा मोठा वाघ परिसरात पाहिला नसल्याचे त्यांनी गावकऱ्यांना सांगितले. घटनास्थळी पगमार्क आढळल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या भागात शोध मोहिम राबविली होती.
आता सोनेगावच्या जंगलात शुक्रवारी याच पद्धतीचा एक वाघ आढळल्याची माहिती मालन यांनी दिली आहे. या वाघाच्या गळ्यात एक लाल पट्टा होता. वाघाला पाहिल्याने आम्ही घाबरलो. अधिक काळ थांबू शकलो नाही. गावकऱ्यांना माहिती दिल्यानंतर अवघा गाव या वाघाला पाहण्यासाठी जंगलातील ओढ्याजवळ आला. पण, त्यावेळी वाघ नव्हता, असेही मालन यांनी सांगितले. दरम्यान, मालन यांनी सांगितलेली माहिती जयच्या वर्णनाला अनुसरून असल्याचे मत पालांदूर येथील संताजी कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. रवी पाठेकर यांनी व्यक्त केले आहे.
घटनास्थळी वाघाची विष्ठा
पुरकाबोडीच्या जंगलात जयच्या आकाराचा वाघ दिसून आल्याची चर्चा पसरताच वनविभागाने या भागावर लक्ष केंद्रित केले आहे. यातूनच शनिवारी गाव परिसरात वनविभागाचे पथक आले असता गावकऱ्यांनी त्यांना मालन यांनी वाघ पाहिल्याचे सांगितले. पथकाने तातडीने त्यांना सोबत घेत घटनास्थळ गाठले. त्यावेळी ओढ्यातील काही जमीन त्याने उकरून काढली होती. सोबतच वाघाची विष्टाही त्या ठिकाणी आढळली. हे सर्व नमुने वनविभागाच्या पथकाने गोळा केले असून तपासणीसाठी पाठविले आहेत. याच्या अवालानंतरच हा वाघ जय की इतर याविषयीचा खुलासा होणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट