संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाचे अधिष्ठाता, राज्यपाल नामनिर्देशित सिनेट सदस्य डॉ. संतोष उर्फ भुजंग ठाकरे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नी मीनल यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. कौटुंबिक प्रकरणामुळे पोलिसांनी महिला सेलकडे ही तक्रार वळती केली आहे.
डॉ. संतोष ठाकरे शहरातील अस्मिता शिक्षण संस्थेच्या महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत होते. याच महाविद्यालयात त्यांच्या पत्नी मीनल प्राध्यापिका आहेत. ठाकरे यांना पंधरा दिवसांपूर्वी संस्थेच्या अध्यक्षांनी त्यांना निलंबित केले होते. कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक व महाविद्यालयाचे ऑडीट न केल्याचा ठाकरेंवर ठपका आहे. दरम्यान, ठाकरे यांच्या पत्नी मीनल यांनी पती संतोष त्यांच्या भावाची पत्नी आणि दोन बहिणींविरोधात मानसिक छळ केल्याची तक्रार नोंदविली. तक्रारीत ठाकरेंविरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. मीनल व डॉ. संतोष यांचा १९९५मध्ये आंतरजातीय विवाह झाला होता. पण, काही वर्षातच ठाकरे संशयी वृत्तीचे होऊन मीनलचा छळ करू लागले. सततच्या मारहाणीमुळे माहेरून निघून गेल्या. परंतु तोडगा निघाल्याने त्या पतीकडे परतल्या. परंतु संतोष ठाकरे यांच्यासह त्यांच्या दोन बहिणींकडून वारंवार होणारा छळ सुरूच राहिल्याचे मीनल यांनी तक्रारीत नमूद केले. दोन मुलींच्या जन्मानंतरही हा त्रास होता. साडेपाच वर्षापूर्वी विधानपरिषद निवडणूक लढविणाऱ्या ठाकरेंनी मीनल यांना वडिलांकडून चार लाख रुपये आणण्यास सांगून छळले. ठाकरेंना चार लाख देऊनही त्यांना त्रास देण्यात आला. सध्या त्यांचा त्रास वाढल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आपणास संतोष ठाकरे यांच्यासोबत राहायचे असून त्यांच्या स्वभावात बदल व्हावा, अशी अपेक्षा मीनल यांनी व्यक्त केली आहे. राजापेठचे निरीक्षक शिरीष मानकर यांनी मीनल ठाकरे यांची तक्रार कौटुंबिक असल्याने समुपदेशानासाठी महिला सेल कडे पाठविली असल्याचे सांगितले आहे.
कोण आहेत ठाकरे?
संतोष ठाकरे यांच्यावर १५ दिवसांपूर्वी निलंबनाची कारवाई झाल्यानंतर आता पत्नीकडून त्यांच्याविरोधात तक्रार आल्याने पुन्हा एकदा शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. संतोष उर्फ भुजंग ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणूक लढविली असून अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचे ते दावेदार होते. विद्यापीठातील अनेक प्राधिकारीणींवर त्यांनी काम केले आहे. माजी आमदार बी. टी. देशमुख यांच्या नागपूर टीचर्स असोसिएशन (नुटा) ला तोंड देण्यासाठी त्यांनी सुक्टा ही संघटना स्थापित केली होती. बीटींच्या उमेदवारांना सुक्टांच्या उमेदवारांनी कडवी झुंज दिली होती.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट