Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

माओवाद्यांचा पोलिस ठाण्यावर हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, गडचिरोली

शहीद सप्ताहादरम्यान छत्तीसगड सीमेलगत असलेल्या पुराडा पोलिस ठाण्यावर माओवाद्यांनी सोमवारी रात्री हल्ला केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांना घातपात घडविता आला नाही. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

कुरखेडा उपविभागामध्ये बेळघाट घाटीनंतर पुराडा हे महत्‍त्वाचे उपपोलिस स्टेशन आहे. सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास या पोलिस ठाण्यावर माओवाद्यांनी गोळीबार केला. माओवाद्यांनी आठ ते दहा राऊंड कोरची रस्त्याच्या दिशेने फायर करताच पोलिसांनीही प्रत्युत्तर देत गोळीबार करण्यास सुरुवात केली. काही वेळानंतर त्यांनी गोळीबार बंद केला. पण, पुन्हा काहीच वेळात मागील बाजूने पुन्हा चार राउंड फायर केले. मात्र, पोलिसांनी प्रतिकार केल्याने सुमारे वीस मिनिटांच्या चकमकीनंतर माओवादी जंगलात पळून गेले. गोळीबाराच्या निमित्ताने पोलिसांना अॅम्ब्युशमध्ये ट्रॅप करण्यासाठीच माओवाद्यांनी हा गोळीबार केल्याचे मानले जात आहे.

पुराडा पोलिस ठाण्यात स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि तात्काळ मदत पोहचवणारी चमू आहे. त्यामुळे माओवाद्यांचा हल्ला यशस्वी होण्याची शक्यता कमी होती. म्हणून रात्रीच्या वेळी गोळीबार केल्यास पोलिस प्रत्युत्तर देऊन पाठलाग करतील. त्यावेळी त्यांना घेरून मारण्याचा माओवाद्यांचा डाव होता. पण, पोलिसांच्या सतर्कतने माओवाद्यांचा हा डाव उधळला गेला. या घटनेनंतर पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख आणि माओवादविरोधी अभियानचे अतिरीक्त अधीक्षक मंजुनाथ यांनी पुराडासह सर्वच पोलिस ठाण्याच्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला.


२५ पोलिस ठाणी अतिसंवेदनशील

गडचिरोली जिल्ह्यात सुमारे २५ पोलिस ठाणी अतिसंवेदनशील आहेत. यात भामरागड, लाहेरी, नारगुंडा, कसनसूर, गट्टा जारावंडी, रेगडी, सावरगाव, मुरुमगाव, पेरमिली देचलीपेठा, रेगुंठा पातागुडम, बेळगाव या पोलिस ठाण्यांचा समावेश आहे. हे सर्व उपपोलिस ठाणे छत्तीसगडच्या सीमेला लागून आहेत. सुमारे ४०० किमीपर्यंत ही सीमा पसरली आहे. याच विस्तीर्ण सीमेचा लाभ घेत पोलिस ठाण्यांवर गेल्या काही वर्षात माओवाद्यांनी हल्ले केले आहेत. पण, पोलिसांनी त्यांचे हे सर्व प्रयत्न आजवर परतावून लावले आहेत. आता शहीद सप्ताहातच पुराडा पोलिस ठाण्याला लक्ष्य करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पण, माओवाद्यांच्या सर्व हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>