राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ९३वा वर्धापन दिन सोहळा ४ ऑगस्ट रोजी अमरावती रोडवरील विद्यापीठाच्या गुरुनानक भवन सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. ख्यातनाम विधिज्ञ अॅड. व्ही. आर. मनोहर यांना 'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुंबई येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलगुरू डॉ. जी. डी. यादव उपस्थित राहणार असून, अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे भूषवणार आहेत. विद्यापीठाच्या वर्धापन दिनी विज्ञान, शिक्षण, सामाजिक व अन्य क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना 'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना' पुरस्कार देण्यात येतो. मागील वर्षी हा पुरस्कार डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांना देण्यात आला होता. यंदा राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. व्ही. आर. मनोहर यांना यंदा हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याच समारंभात विद्यापीठाचे आदर्श पुरस्कार तसेच अन्य विशेष पुरस्कारही प्रदान करण्यात येतील.
यात आदर्श शिक्षण संस्था म्हणून हिस्लॉप कॉलेज, तर आदर्श अधिकारी म्हणून वसीम अहमद यांची निवड करण्यात आली आहे. आंतरमहाविद्यालयीन वार्षिकांक स्पर्धा, विविध प्रकारच्या निबंध स्पर्धांच्या पारितोषिकांचे वितरणही यावेळी करण्यात येणार आहे. आदर्श अधिकारी पुरस्काराच्या रकमेत यंदा वाढ करून ती पाच हजार करण्यात आली आहे. वर्धापनदिनाचे औचित्य साधून मुख्य सोहळयानंतर विद्यापीठाच्या विविध कार्यालयांतील गायक कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांची सुश्राव्य मैफल रंगणार आहे. हिंदी व मराठी लोकप्रिय गीते या कार्यक्रमात वाद्यवृंदाच्या साथीने सादर केली जातील. वर्धापनदिन सोहळ्याला मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन कुलगुरूंनी केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट