माजी राज्यमंत्री व बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संयोजिका अॅड. सुलेखा कुंभारे यांनी विदर्भासाठी सहकारी पक्ष भाजपवर डोळे वटारले आहे. सत्तेत येऊन दोन वर्षांचा काळ लोटला. विदर्भाची घोषणा तर दूरच, साधी त्यादिशेने पावलेही उचलली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत येत्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भातील भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे. ९ ऑगस्ट या क्रांतिदिनी शिवसेना वगळता सर्व पक्षांना सोबत घेऊन संविधान चौकात निर्धार आंदोलन करण्याचा मनोदय बुधवारी पत्रकार परिषदेत त्यांनी जाहीर केला.
गेल्या ५६ वर्षांपासून विदर्भाचा विकास रखडला, अनुशेषही वाढला. काँग्रेसने विदर्भाच्या भरोश्यावर अनेक वर्षे सत्ता उपभोगली. परंतु, विदर्भाबाबत भूमिका घेतली नाही. त्यामुळे काँग्रेस सत्तेबाहेर झाली. निवडणुकीत भाजपने जाहीरनाम्यात वेगळा विदर्भ करण्याचे जाहीर केले. त्यामुळेच बरिएमंचने भाजपला राजकीय पाठिंबा जाहीर केल्याची आठवण अॅड. कुंभारे यांनी करून देत वेगळ्या विदर्भाबाबत ठोस भूमिका न घेतल्यास वेगळा विचार करण्याचा इशाराही दिला. राज्याचे मुख्यमंत्री विदर्भातले, केंद्रीयमंत्री गडकरी विदर्भातले, तरीही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत, मिहानमध्ये मोठे उद्योग आले नाहीत, सुशिक्षितांना नोकऱ्या लागत नाही, बेरोजगारांना भटकावे लागत आहे. पर्यटन केंद्र म्हणून विदर्भाच्या विकासासाठी पाऊले उचलली जात नाहीत. तेव्हा स्वतंत्र विदर्भ हाच एकमेव पर्याय उरला असल्याचे अॅड. कुंभारे यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेबांनीही छोटया राज्याची संकल्पना मांडली होती. राज्य पुनर्रचनेच्या फजल अली आयोगानेही विदर्भाचे समर्थन केले होते. विदर्भात संसाधनांची कमतरता नाही. हिंदी भाषकांची पाच राज्ये आहेत. तेव्हा मराठी भाषकांचे दोन राज्ये का होऊ शकत नाहीत? असा सवाल करीत त्यांनी गरिबीत होरपळणाऱ्या १० हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे काय? असा जाब विचारला. यामुळेच बरिएमंचतर्फे क्रांतिदिनी एका दिवसाचे सांकेतिक उपोषण करण्यात येत असल्याचे सांगितले. या आंदोलनात शिवसेनावगळता भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी व इतरही पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी भीमराव फुसे, वंदना भगत, नंदा गोडघाटे आदी उपस्थित होते.
अॅड. प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व मान्य
रिपाइं एकतेसाठी माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व आपणास मान्य आहे. तसे यापूर्वीही ते स्पष्ट केले आहे. सर्व पक्षांनी त्यांचे गट विसर्जित करून एकीकरण केल्यास आपला मंचही विसर्जित करण्याची तयारी अॅड. कुंभारे यांनी दर्शविली. दादरमधील आंबेडकर भवनाच्या जागेवर एक मोठी वास्तू होणार, या आश्वासनाचे आपण समर्थन केले होते. मध्यरात्री आंबेडकर भवन पाडण्याचे आपण कदापिही समर्थन करू शकत नाही, असे स्पष्ट करीत त्यांनी याप्रश्नावर रत्नाकर गायकवाडांकडून फसवणूक झाल्याचा खुलासाही केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट