नागपुरातील चितार ओळ ही मूर्तिकारांची खाण. भोसले काळापासून गणेश मूर्ती तयार करणारे अनेक मूर्तिकार येथे आहेत. आता मात्र मागील काही वर्षात कोकणातील पेण असो वा औरंगाबाद, वा असो पुणे, अमरावती आणि आर्वी या ठिकाणच्या मूर्ती मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहेत. यामुळे स्थानिक मूर्तिकारांचा व्यावसाय रोडावला. त्यात खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे मूर्तिकार नाराज आहेत.
भोसलेकालीन परंपरा असलेले बिंड कुटुंबीयातील मूर्तिकार मनोज बिंड यांनी सांगितले की, 'मूर्तिसाठी लागणारी माती ही आतापर्यंत आम्ही नाग नदीतून घेत होतो. आता मात्र तिथून माती मिळणे अशक्य झाले आहे. यामुळे भंडाऱ्याहून ही माती बोलवावी लागते. त्या मातीचा एक छोटा टेम्पो ७ हजार रुपयांचा होतो. त्यात पाच ते सात फुटांचे जास्तीत जास्त चार गणपती होतात. मूळ ढाच्यांसाठी उपयोगात येणारे तणस आतापर्यंत ६५ रुपये किलो होते. ते आता ९५ रुपये किलो झाले आहेत. या सर्वांमध्ये कारागिरांचा पगार, मूर्ती सुकवण्यासाठी वापरात येणाऱ्या हिटरसारठीचा गॅस सिलिंडर यांचा खर्च खूप होतो. पण, मूर्तीची किंमत वाढवता येत नाही. बाहेरील मूर्ती खूप येत असल्याने मागणी कमी झाली आहे. यामुळेच तर आता परंपरागत मूर्तिकारदेखील दिवसेंदिवस कमी होत आहेत.' चितार ओळीत काही वर्षांपर्यंत जवळपास १०० मूर्तिकार होते. आज ही संख्या २५ वर आली आहे. एक मूर्तिकार मेपासून मूर्ती तयार करण्यास सुरुवात करतो. गणपतीपर्यंत छोट्या-मोठ्या जास्तीत जास्त ७० ते ७५ मूर्ती तो तयार करू शकतो. पण, एकूणच आता ते संकटात आहेत, हे नक्की.
दुसरीकडे शहरात आता पेण येथील गणेश मूर्तीदेखील येण्यासाठी सज्ज झाले आहेत. शास्त्रात लिहिल्यानुसार शाडू मातीची गणेश मूर्ती सर्वोत्तम असते. ती संपूर्ण महाराष्ट्रात केवळ रायगड जिल्ह्यातील पेण येथे तयार होते. या मूर्ती सुबकदेखील असतात. पण, यंदा डिझेलच्या वाढत्या दरामुळे या मूर्ती महागण्याची शक्यता आहे. पेण मूर्तीचे पश्चिम नागपुरातील सर्वात मोठे विक्रेते कन्हैय्या कटारे यांनी सांगितले की, 'एका ट्रकमध्ये जवळपास ३५० मूर्ती येतात. या मूर्तींची किंमत पेण गावात फार वाढलेली नाही. पण, डिझेलच्या दरात वाढ झाल्याने त्याचा परिणाम किमतींवर होईल, तर ही मूर्ती पूर्ण मातीची व भरीव असते. यामुळे उचलण्याचा खर्चच जवळपास प्रतीमूर्ती १०० रुपये येतो. हे सर्व पकडून यंदा या मूर्ती महागण्याचा अंदाज आहे.'
प्रत्यक्ष पेण गावातील मूर्तींची विक्री करणारे नागपुरात २० विक्रेते आहेत. हे सर्व विविध सभागृहांमध्ये प्रदर्शन भरवतात. बाकी पेणच्या नावाखाली केवळ विक्री होते. अशा मूर्तींची संख्या १० हजारांच्या घरात असते, तर सर्वाधिक मूर्ती या अमरावती व आर्वी येथून आलेल्या प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्याच असतात. यामुळेदेखील गणेशभक्तांसह स्थानिक मूर्तिकारांमध्ये नाराजी आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट