'समाजाकडून आपण अनेक गोष्टी घेत असतो आणि समाजातल्या अनेक घटकांना काही देणेही लागतो. संस्काराची मुळे खोलवर रुजली असतील तर चांगुलपणा कुठल्या ना कुठल्या स्वरूपात दिसून येतो. परिस्थितीशी झुंज देत दहावीच्या परीक्षेत गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहत 'मटा'ने समाजातल्या दातृत्वाला घातलेली साद त्याचेच प्रतीक आहे. ही मदत नुसती आर्थिक नाही तर चांगुलपणाची उमेद जागविणारी आहे. संवेदनशीलतेची ही शृंखला यापुढेही कायम ठेवावी,' असा आशावाद नासुप्रचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बुधवारी व्यक्त केला.
बिकट परिस्थितीतही दहावीच्या परीक्षेत यश खेचून आणणाऱ्या तृप्ती गोटाफोडे, विजयश्री उपाध्ये आणि सौरभ मडावी तीन विद्यार्थ्यांना 'मटा'च्या हाकेला प्रतिसाद देत नागपूरकरांनी भरभरून मदत केली. वाचकांकडून प्राप्त ही आर्थिक मदत डॉ. म्हैसेकर यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना सोपविण्यात आली. 'मटा' कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात 'मटा'चे निवासी संपादक श्रीपाद अपराजित यांच्यासह अन्य सहकारी उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, संस्कारातूनच मुले घडतात. आयुष्यात कितीही यशस्वी झालात तरी आई-वडिलांसोबतच संकटाच्या काळात पाठीशी उभे राहणाऱ्यांना विसरू नका. जन्मदाते आणि मातृभूमी याहून मोठे काहीच नाही. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मनोरंजनात वेळ घालवण्यापेक्षा ज्ञानात वाढ होईल, असे छंद जोपासण्याचे आवाहनही त्यांनी केले. स्पर्धेच्या युगात वावरत असताना शिक्षणाचा खर्च पेलवेनासा झाला आहे. अशावेळी समाजातील सजग घटकांनी केलेली मदत उज्ज्वल भविष्यासाठी उपयोगी ठरेल, असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. तत्पूर्वी, श्रीपाद अपराजित यांनी 'मटा हेल्पलाइन' उपक्रमामागील वाटचालीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या 'मटा' वाचकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. मंदार मोरोणे यांनी संचालन केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट