'परिस्थितीशी झुंज देत देत मुलांनी दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविले खरे, पण तरीही पुढे सगळा अंधारच दिसत होता. शिक्षणाचा खर्च कसा पेलायचा, या चिंतेने रात्र-रात्रभर डोळ्याला डोळा लागत नव्हता. मुलं नाउमेद होण्याची वेळ आली होती. पण, ऐनवेळी महाराष्ट्र टाइम्सची हेल्पलाइन मदतीला धावून आली. आमचा कोलाहल समाजातल्या संवेदनशील नागपूरकरांनी ऐकला. दातृत्वाने केलेल्या या मदतीमुळे मुलांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. या सहवेदनेची जाणीव आयुष्यभर लक्षात राहील,' अशा भावना तृप्तीची आई उषा गोटाफोडे, विजयश्रीची आई गौरी उपाध्ये, सौरभचे काका हनुमंत मडावी यांनी व्यक्त केल्या.
बिकट परिस्थितीतही तृप्ती गोटाफोडेने दहावीत ९२, विजश्री उपाध्येने ९६, तर सौरभ मडावीने ९१ टक्क्यांचा गड सर केला. मात्र, हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे शिक्षण थांबते की काय, अशी वेळ त्यांच्यावर ओढवली होती. तिघांच्याही घरात कर्तापुरुष नव्हता. त्यामुळे पुढे शिक्षण घ्यायचे कसे, हा पेच त्यांच्यापुढे उभा ठाकला होता. त्याची ही परिस्थिती मटाने हेल्पलाइनच्या माध्यमातून समाजासमोर मांडली. या गुणवंत विद्यार्थ्यांवर शिक्षणाला मुकण्याची वेळ ओढवत असल्याने मटाने समाजातल्या दातृत्वाला मदतीची साद घातली. चांगुलपणा जागा असलेल्या संवेदनशील नागरिकांनी 'फूल ना फुलाची पाकळी' म्हणून मटाच्या हाकेच्या प्रतिसाद देत आर्थिक पाठबळ उभे केले. या मदतीचे धनादेश गुणवंत विद्यार्थ्यांच्या हाती सुपूर्द करण्यात आले.
त्यानंतर भावना व्यक्त करताना तृप्तीची आई उषाताई हळव्या झाल्या. त्या म्हणाल्या, 'मुलींचं शिक्षण थांबतं की काय, अशी भीती वाटत होती. पण, ऐनवेळी मटाची हेल्पलाइन संकटकाळात मदतीला धावून आली. समाजातला चांगुलपणा पूर्णतः संपलेला नाही, याची जाणीव आता होत आहे. त्यामुळे निदान तृप्तीच्या शिक्षणाचं आर्थिक ओझं हलकं झाल्याची जाणीव होत आहे. समाजातल्या दानशुरांची ही मदत आयुष्यभर विसरता येणार नाही.'
विजयश्रीची आई म्हणाली,'शिक्षणाचा खर्च आवाक्याबाहेर जातोय. त्यात एकटीचा हातभार कुठवर कामी येणार, असे सारखे वाटायचे. मात्र, हेल्पलाइनने दिलेला हा आधार आता आयुष्यभर उमेदीची शिदोरीच आहे.'
सौरभचे काका हनुमंत मडावी सांगत होते, 'घरातला कर्तापुरुषच गेल्याने मडावी कुटुंबासमोर साध्या दोन वेळच्या खाण्याची भ्रांत तयार झाली होती.
त्यात शिक्षणाचा खर्च कसा करणार, हा पेच निर्माण झाला होता.
हेल्पलाइनच्या माध्यमातून नागरिकांनी केलेल्या मदतीमुळे हा पेच मोकळा झाला आहे. सौरभलाच नव्हे तर आम्हा सर्वांना याची जाणीव आहे. दातृत्वाचे हे ऋण आयुष्यभर फेडता न येणारे आहेत.'
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट