कंबर वाकवून त्याने कधी घरातील पसारा आवरला नसेल, पण येथे मात्र त्यासाठी तो धडपडत होता. रोडरोमिओला तिने कदाचित यापूर्वी कधी उलट उत्तर दिले नसेल. येथे त्याच्या पोस्टरला चपलेने बडवताना ती सगळा राग काढत होती. निमित्त होते रुबी सोशल वेलफेअर सोसायटीच्यावतीने आयोजित लैंगिक समानतेवरील मेळाव्याचे. बुधवारी सक्करदरा येथील सेवादल महिला महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आपल्या घरातील आई किंवा बहीण दररोज घरातील कित्येक कामे करतात, पण अनेक मुलांना त्याची जाणीवही नसते. रोडरोमिओंचा त्रास कित्येक मुलींना होतो. एकाच समाजात राहताना मुलगा आणि मुलगी यांना समानतेची वागणूक मिळेलच, याचीही शाश्वती नाही. या सगळ्या बाबी कॉलेज युवक-युवतीपर्यंत पोहोचाव्यात म्हणून या अनोख्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सेवादल कॉलेजचे अध्यक्ष संजय शेंडे, करिअर कौन्सिलर सपना शर्मा, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सीमा साखरे, सक्करदरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी यावेळी उपस्थित कॉलेज युवक-युवतींना मार्गदर्शन केले. बुधवारी संपूर्ण दिवसभर हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
उंचावले मनोबल मुलींचे
मेळाव्यात उपस्थित युवकांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या गेल्या. घरात इतस्ततः पडलेल्या वस्तू उचलण्यासाठी मुलांनी मुलींशी स्पर्धा करावी लागली. रोडरोमिओच्या पोस्टर्सला चपलेने बडवण्याचा आनंद मुलींनी मनसोक्त अनुभवला. सडकछाप मुलांनी छेडखानी करू नये आणि मुलींनी ती सहन करू नये, असा संदेश 'छेडखानी रोको' या खेळातून देण्यात आला. मुलींवर होणारे अन्याय आणि त्यांना सहन करावे लागणारे त्रास यामुळे अनेकींचे मनोबल ढासळते. हे मनोबल वाढविण्यासाठी लहानपणी खेळलेल्या सापशिडीचा आधार घेण्यात आला होता. याशिवाय, मानवी शरीराची रचना, लैंगिकता, सौंदर्य, विविध कायदे यांविषयी रंजक माहिती देण्यात आली. मोठ्या संख्येने कॉलेज विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
रुजावी समानतेची जाणीव!
आपल्याकडे लहानपणापासून मुला-मुलींवर ठराविक स्वरूपाचे संस्कार होतात. पुरुषत्वाची खोटी संकल्पना तोडण्याचा प्रयत्न आजच्या मेळाव्यातून करण्यात आला. येथील परत जाताना युवकांनी समानतेची जाणीव घेऊन जावे अशी आमची अपेक्षा आहे. समानता हा मुलींचा नाही तर मानवतेचा मुद्दा आहे, असे आयोजक रुबिना पटेल म्हणाल्या.
भेदभावाचे प्रमाण कमी!
मुलगा आणि मुलगी यांच्यात घरापासून भेदभाव होतो हे निश्चितच. प्रत्येक मुलीला कधीतरी अशा भेदभावाचा सामना करावाच लागतो. मात्र, आता तो बराच कमी झाला आहे असे वाटते. मुलगा असो की मुलगी, सर्वांना समान वागणूक मिळायला हवी, असे मत निशा अतकरी या विद्यार्थिनीने व्यक्त केले.
अन्याय व्हावा दूर!
माझ्या ग्रुपमध्ये मुले आणि मुली दोन्ही आहेत. पण, आमच्यात भेदभावाची जाणीव कधी झाली नाही. मात्र, बालविवाह, शिक्षण, सामाजिक हक्क, बलात्कार अशा स्वरूपात अन्यायाच्या घटना घडत आहेत. आज मुली सगळ्याच क्षेत्रात मुलांइतकेच चांगले काम करत आहेत. कोणत्याही स्वरूपातील भेदभाव त्यांच्या वाट्याला येऊ नये, असे राहुल बांडेबुचे हा विद्यार्थी म्हणाला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट