दामदुप्पट योजनेचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करण्यात आलेल्या वासनकर घोटाळा प्रकरणात बुधवारी तिसरे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले. आतापर्यंत या प्रकरणी एकूण ६७ हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
आत्तापर्यंत एकूण तीन आरोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत. बुधवारी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रांनंतर या आरोपपत्रांच्या कागदांची संख्या ही आता ६७ हजारांवर पोहोचली आहे. वासनकरने परतावा करण्याची रक्कम १७६ कोटींच्यावर असून, आतापर्यंत ६६० गुंतवणूकदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार घोटाळ्याचा आकडा ९४ कोटींच्यावर गेला आहे. वासनकर घोटाळा प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत वासनकर व त्याच्याशी संबंधित व्यक्तींची ३० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. गुन्हेशाखेचे प्रभारी अतिरिक्त पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, सहायक पोलिस आयुक्त नीलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या तपासात आतापर्यंत पोलिसांनी प्रशांत वासनकर, विनय वासनकर, अभिजित चौधरी, मिथिला वासनकर, सुजित मुजुमदार, सारिका चाकुंडे, भाग्यश्री वासनकर, कुमुद जयंत चौधरी, मीनाक्षी सचिन कोवे, श्रीनिवास अय्यर, वैशाली अय्यर, अविनाश भुते, पराग हांगेकर, रामकुमार अय्यर, तनुजा धर्माधिकारी, पायल बिंद्रा, राजेश तूरकर, कौस्तुभ शास्त्री, सुहास खापरे, देवदत्त करदळे आदींसह २३ जणांना अटक केली आहे. प्रशांत वासनकर, विनय वासनकर व अभिजित चौधरी ४ ऑगस्ट २०१४पासून न्यायालयीन कोठडीअंतर्गत सध्या कारागृहात आहेत. या प्रकरणी अॅड. कल्पना पांडे या सरकारची बाजू मांडत आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट