'हल्लीचे जग हे स्क्वेअर फुटात अडकले आहे. भवतालचा अस्वस्थ वर्तमान आणि कावऱ्याबावऱ्या चेहऱ्यांवरील भावभावनांशी एका घटकाला काहीही देणेघेणे नाही. अवतीभोवती वणवा पेटला असताना ज्यांच्या मनात संवेदनशीलतेची वात तेवत असते तिथेच चळवळीची बिजे रुजतात. त्यामुळे समाजाला दिशा देणाऱ्या चळवळीची उभ्या रहायच्या असतील तर स्क्वेअर फुटाचा परीघ ओलांडला पाहिजे. तरुणांनी त्यासाठी पुढे यावे, अशी भावनिक साद, नाना पाटेकर यांनी येथे घातली.
लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थानच्या 'एकलव्य एकल विद्यालयां'तील शिक्षक, पर्यवेक्षकांसाठी रेशीमबाग येथील स्मृती मंदिराच्या सभागृहात पाच दिवसीय प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले होते. या सत्राच्या समारोपात प्रमुख पाहुणे म्हणून नाना पाटेकर बोलत होते. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी अध्यक्षस्थानी, केंद्रीय गृहराज्यमंत्री खासदार हंसराज अहिर प्रमुख पाहुणे उपस्थित होते. व्यासपीठावर राष्ट्रसंत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, माजी आमदार अशोक मानकर, भाजपचे संघटन मंत्री रवींद्र भुसारी प्रामुख्याने उपस्थित होते.
अभिनयातल्या कर्तृत्व मोठे नाही. तुमचे रानावनातील कष्ट मोलाचे आहेत. मला तुमच्याकडून अनेक गोष्टी शिकायच्या आहेत. परिस्थितीशी लढणारे एकलव्य शोधून त्यांची ताकद विधायकतेला जोडली जाऊ शकते. मानकर स्मृती संस्थानने सुरू केलेली ही चळवळ माणुसकीची 'बॅटन रिले' आहे. शेतीची अवस्था सुधारायची असेल तर सामूहिक शेतीचे प्रयोग झाले पाहिजेत, असेही नानांनी नमूद केले.
'नाम'पासून प्रेरणा घेत लवकरच आत्महत्याग्रस्त भागातील १६२ शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना गोधन वाटप केले जाणार असल्याची माहिती हंसराज अहिर यांनी दिली. तत्पूर्वी संस्थासचिव राजीव हडप यांनी प्रास्ताविकातून भूमिका मांडली. दुर्गम आदिवासी भागात समर्पणाच्या भावनेतून काम करणारे पर्यवेक्षक रवी भोयर, जानराव बेलसरे तर आदर्श शिक्षक किशोर गुरुले, ममता सूर्यवंशी, अशोक धारवे, संदीप भांडेकर यांचा सत्कार करण्यात आला.
'दुर्गम भागात लोकशाहीऐवजी दहशत पोहोचली'
अध्यक्षीय भाषणात नितीन गडकरी म्हणाले, दुर्गम-आदिवासी भागात लोकशाहीऐवजी दहशत पोहोचली हे आजवरच्या सरकारचे अपयश आहे. मानकर स्मृती संस्थानतर्फे चालविल्या जाणाऱ्या एकल शाळा शिक्षणापलीकडे जाऊन संस्काराची बिजे रोवतात. जल, जंगल, जमीन, जनावर या चतु:सूत्रींना शिक्षण, आरोग्य, सेवा, विकास आणि स्थैर्य या पंचसूत्राची जोड दिल्यास आदिवासींना मुख्य प्रवाहात आणणे शक्य होईल.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट