ट्रॉमा युनिट जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णांच्या सेवेत दाखल करण्याचे निर्देश राज्याच्या मुख्य सचिवांनी अधिवेशन काळात दिले होते. परंतु, डिजिटल सबस्ट्रॅक्शन एन्जिओग्राफी यंत्रावरून ट्रॉमाचा ड्रामा रंगला. रेडिओलॉजी विभागाने अधिष्ठात्यांना विचारात न घेता थेट वैद्यकीय संचालकांना पत्र लिहून हे उपकरण पळविण्याचा घोळ घातला. त्यामुळे कंपनीने रेडिओलॉजी विभागात बांधकाम केले. परंतु, हे यंत्र ट्रॉमासाठी असल्याने विद्यमान अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी त्यास कडाडून विरोध केला. त्यामुळे कंपनी आणि मेडिकल असा वाद रंगला. सुरुवातीपासूनच या युनिटवरून अनेक नाटके रंगली. प्रारंभी इमारतीचा चुकीचा प्लान, नंतर चुकीचे बांधकाम, त्यात अक्षम्य त्रुटी, उपकरणांची पळवापळवी, विजेची जोडणी, पाण्यावरून वाद अशा अनेक मालिकांची यात भर पडली. शेवटी विद्यमान अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी या सर्व वादांवर मात करीत मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ट्रामाचे लोकार्पण करण्याची तयारी सुरू केली. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे, दोन्ही विभागांच्या संचालकांना तारीख निश्चित करण्यासंदर्भात १४ मेची वेळ मागितली. मात्र, मंत्रालयातर्फे यावर अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही. त्यामुळे आता पुढचे १५ दिवस तरी ट्रामाचे लोकार्पण शक्य नाही. त्यामुळे यात आता मंत्रालयानेच तारखेचा खोडा घातल्याचे समोर येत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट