Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

पोलिस ठाण्यात उंदरांना दारू-गांजाची ‘पार्टी’

$
0
0

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
उंदीर, पोलिस ठाणे आणि दारू-गांजा या शब्दांचा तसा परस्परसंबंध नाही. मात्र, नागपुरातील लोहमार्ग पोलिस ठाण्यात चोर मार्गाने घुसून तेथील जप्त केलेला गांजा आणि दारू फस्त करणाऱ्या उंदरांमुळे लोहमार्ग पोलिस त्रस्त झाले आहेत. चक्क पोलिस ठाण्यातील ही उंदरांची 'पार्टी' हा चर्चेसहच चिंतेचाही विषय आहे.

'रेल्वेस्थानकांवरील उंदरांचा सुळसुळाट' हे भारतीय रेल्वेसमोरील देशव्यापी आव्हान आहे. अलीकडेच लखनौ रेल्वेस्थानकावरील उंदरांच्या बंदोबस्तासाठी ५ लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. नागपुरातही उंदरांनी रेल्वे प्रशासन आणि लोहमार्ग पोलिसांना जेरीस आणले आहे. नागपूर रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक १ ला लागूनच लोहमार्ग पोलिस ठाणे आहे. रेल्वेस्थानकावर किंवा गाड्यांमध्ये पकडलेली दारू, गांजा जप्त करून या ठाण्यात ठेवण्यात येते. ज्या खोलीत हा सारा 'माल' ठेवतात ती म्हणजे उंदरांचा 'अड्डा' झाली आहे. रुळापासून खालच्या बाजूने थेट लोहमार्ग ठाण्याच्या भिंतीपर्यंत उदरांनी बिळे केली आहेत. या चोरमार्गाने त्यांचा रुळ ते ठाणे असा संचार सुरू असतो. त्यामुळे आरोपींच्या कोठडीच्या बाजूलाच असलेल्या या खोलीत भिंतीतून येऊन उंदीर दारू - गांजावर ताव मारत असतात. अलीकडे दारूच्या बाटल्याही प्लास्टिकच्या येऊ लागल्या आहेत.

त्यामुळे त्या कुरतडून ते मद्यप्राशन करतात. गांजा आणि दारू असा डबल डोस घेतलेल्या या उंदरांच्या टोळ्यांना रुळावर प्रवाशांच्या कृपेने खायला वेगवेगळे पदार्थ मिळत असतात. उंदरांच्या या त्रासाला कंटाळून काही दिवसांपूर्वी लोहमार्ग ठाण्यात जप्त केलेला दारू-गांजा ठेवायला मोठी लोखंडी पेटी आणली मात्र ती अपुरी पडते. अलीकडे दारू, गांजा जप्तीची प्रकरणे वाढली आहेत. त्यामुळे हा माल खोलीत तसाच ठेवण्याशिवाय पर्याय नाही आणि त्याचाच फायदा उंदीर घेत असतात. या खोलीतील जप्त केलेल्या बॅग, कपडे यांचाही फडशा हे उंदीर पाडत असतात.

रेल्वे प्रशासनाने कितीही आवाहन केले तरी नको असलेले खाद्यपदार्थ रुळावर फेकणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या खाद्यपदार्थांमुळे परिसरातले सारे उंदीर रुळावर येतात आणि तेथेच वास्तव्याला राहतात. एक प्रकारे रुळावरील खाद्यपदार्थ खाऊन रुळ स्वच्छ करण्याचे काम हे 'मामा' करीत असले, तरी त्यांच्या अन्य 'कर्तृत्वा'मुळे रेल्वेपुढे आणि नागपुरात विशेषतः लोहमार्ग पोलिसांपुढे उंदरांचे मोठे संकट उभे ठाकले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>