पुणे, ठाणे या शहरांपेक्षा आपल्या शहरातील प्रदूषण पातळी कमी आहे, असा विचार तुम्ही करत असाल तर थांबा! जागतिक आरोग्य संघटनेने अलीकडेच प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार, नागपूर हे राज्यातील सहावे, देशातील ४९वे तर जगातील १७५वे प्रदूषित शहर आहे. पुणे आणि ठाणे या दोन्ही शहरातील 'पार्टिक्युलेट मॅटर २.५' हे नागपुराच्या तुलनेत बरेच कमी असल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे.
जगभरातील १०३ देशांमधील वायू गुणवत्तेचा अभ्यास करण्यात आला. या शहरांमधील मुख्यत्वे 'पार्टिक्युलेट मॅटर २.५' आणि 'पार्टिक्युलेट मॅटर १०' यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. आहे. राष्ट्रीय स्तरावर या शहरांच्या वायू गुणवत्तेची माहिती उपलब्ध आहे. या माहितीच्या आधारेच हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. नागपुरात एकूण सहा ठिकाणी वायूच्या गुणवत्तेचे मोजमाप केले जाते. यातील तीन ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे तर तीन ठिकाणी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेतर्फे (नीरी) हे मोजमाप केले जाते. उपलब्ध असलेल्या आकडेवारीचा अभ्यास केल्यास २०१४च्या तुलनेत काही सुधारणा झाली आहे. २०१४मध्ये नागपूर हे देशातील ३४ व्या क्रमांकचे प्रदूषित शहर होते. यंदा शहराचा ४९ वा क्रमांक लागतो. परंतु, पुणे ६०, हैदराबाद ७९ आणि ठाणे ८६ व्या क्रमांकांवर आहे. दुचाकी आण चारचाकी वाहानांच्या संख्येचा विचार केल्यास नागपूर या तिन्ही शहरांपेक्षा मागे आहे. असे असूनही नागपुरात जास्त प्रदूषण कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
२०१४ च्या तुलनेत शहरात 'पीएम १०'मध्ये घट झाली, ही चांगली बाब आहे. 'पीएम २.५'मध्ये मात्र वाढ झाली आहे. विदर्भात चंद्रपूर आणि अकोला ही शहरे सगळ्यात जास्त प्रदूषित आहेत. नागपूरचा तिसरा क्रमांक लागतो.
'शहरातील गुणवत्ता मोजमापाची ठिकाणे कशी निवडली जातात यावर बऱ्याच गोष्टी अवबंलून आहेत. ज्या ठिकाणी गुणवत्ता मोजमाप होत आहे त्याच ठिकाणी बांधकाम अथवा इतर काही गोष्टी सुरू असल्यास प्रदूषणाची पातळी नक्कीच वाढणार', असे मत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट