Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 33846

मेट्रो मार्ग बदल इमारतींच्या पथ्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नागपूर नागपूर मेट्रो रेल्वेच्या अलायनमेंटमध्ये पुन्हा बदल करत अजनी रेल्वेस्टेशनला मेट्रो रेल्वेचा थांबा देण्यात आल्याने पूर्वीच्या मार्गात येणाऱ्या इमारतींना आता मेट्रो रेल्वे धडकणार नाही. हा मार्ग बदलल्याने संकटात आलेल्या इमारतींना आता दिलासा मिळाला आहे. काँग्रेसनगरमधील 'इम्प्रेशन प्लाझा' या पाच मजली इमारतीसह अनेक घरांचे कंपाउंडही आता सुरक्षित राहणार आहे.

ऑटोमोटिव्ह चौकातून निघणारी मेट्रो नारी रोड, इंदोरा चौक, कडबी चौक, गड्डी गोदाम चौक, कस्तूरचंद पार्क, झीरो माइल, सीताबर्डी, काँग्रेसनगर, रहाटे कॉलनी, अजनी चौक, छत्रपती चौक, जयप्रकाशनगर, उज्ज्वल नगर, एरअपोर्ट, मिहानपर्यंत जाणार होती. नागपूर मेट्रो रेल्वेच्या मार्गात येणारी काँग्रेसनगरमधील 'इम्प्रेशन प्लाझा' ही पाच मजली इमारत तुटणार होती. काँग्रेसनगरमधून रहाटे कॉलनीकडे जाण्याच्या मेट्रोमार्गात ही इमारत येत होती. गौतम गुंदेचा यांनी सुमारे १५ वर्षांपूर्वी ही इमारत बांधली. या इमारतीमध्ये २३ दुकाने आणि १२ फ्लॅट आहेत. चार फ्लॅट गुंदेच्या यांच्याच मालकीचे असून इतर फ्लॅट आणि दुकाने विकण्यात आली आहे. गौतम गुंदेचा स्वतः आपल्या कुटुंबासह याच इमारतीत राहतात. मेट्रो रेल्वेचा मार्ग बदलावा आणि आमची इमारत वाचवावी, अशी मागणी या इमारतीतील नागरिकांनी मेट्रो रेल्वेच्या लोकसंवाद कार्यक्रमात केली होती. या दुकानांवर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमचे दुकान तोडू देणार नसल्याची भूमिका येथील दुकानदारांनी घेतली होती. इमारत जाणार असल्याने एनएमआरसीएलकडून या दुकानदारांना नोटीसही पाठविण्यात आली होती. त्यामुळे काहींनी दुकाने देण्यास तयारी दर्शविली होती. मात्र, आता पुन्हा इमारत वाचणार असल्याने त्यांच्यात संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

अधिकाधिक नागपूरकरांना मेट्रो रेल्वेची सफर घडावी, यासाठी नागपूर मेट्रो रेल्वेच्या अलायनमेंटमध्ये पुन्हा बदल करत अजनी रेल्वेस्टेशन हा मेट्रो रेल्वेचा थांबा असणार आहे. मध्यवर्ती कारागृहापासून जाणाऱ्या डीपी रस्त्यावरून मेट्रो रेल्वे धावणार आहे.

आता कुणावर धडकणार?

डीएमआरसीने आखलेल्या मेट्रो रेल्वे आराखड्यात होमगार्ड, रामकृष्ण मठ, फॉरेन्सिक लॅबही तुटणार होते. या इमारती वाचविण्याचे नियोजन मेट्रो रेल्वेने आधीच केले होते. मात्र, अनेक घरांच्या कंपाउंड वॉल तुटणार होत्या. मार्गबदलामुळे आता भिंतीही वाचणार आहेत. मात्र, नव्या मार्गावरील काय काय जाणार याचे सर्वेक्षण सुरू असून, आता कोणत्या इमारतींना मेट्रो धडकणार, याची माहिती मोजणीनंतरच पुढे येईल. ऑटोमोटिव्ह चौक ते मिहान आणि प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर या ३८ किलोमीटरच्या मार्गावर मेट्रो रेल्वे साकारत आहे. मेट्रोरेल्वेसाठी मोठ्या प्रमाणात सरकारी जागा संपादित करण्यात येत असली तरी साडेतीन हेक्टर जागा खाजगी मालकीची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 33846

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>