वर्धा मार्गावरील सोमलवाडा चौक येथील शेकडो कोटींच्या साडेपाच एकर जागेच्या वादातून झालेल्या आर्किटेक्ट व इंडियन सिटिझन वेलफेअर मल्टिपर्पझ सोसायटीचे सचिव एकनाथ धर्माजी निमगडे (७२) यांच्या हत्येची सुई सिद्दिकी यांच्यावरच फिरत आहे. त्यामुळे सिद्दिकीच पोलिसांच्या रडारवर असून, पोलिस त्यांच्यासह पायोनिअर समूहाचे अनिल नायर, ग्रीन लिव्हरेज कंपनीचे आदित्य गुप्ता व त्यांच्या वडिलांची कसून चौकशी करीत आहेत. सिद्दिकी हे हिंदुस्थान ट्रॅव्हल्सचे संचालक आहेत.
मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास लाल इमली मार्गावर बुरखाधारी युवकाने निमगडे यांच्यावर बेछूट गोळीबार केला होता. त्यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. मेयो हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, निमगडे हत्याकांडाच्या ३६ तासानंतरही पोलिसांनी मारेकरी व सुपारी देणाऱ्याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही.
आतापर्यंतच्या तपासात पोलिसांनी सेंट्रल एव्हेन्यूवरील २५ पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहेत. एका फुटेजमध्ये मारेकरी दिसत आहेत. मात्र बुरखा बांधल्याने तो कोण याबाबत कोणतीही माहिती पोलिसांना मिळालेली नाही. निमगडे हत्याकांडाच्या तपासासाठी पाच पोलिस निरीक्षक, १२ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक व आठ पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले आहे. गुन्हे शाखाही या प्रकरणाचा समांतर तपास करीत आहेत. परिसरातील गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली आहे. या हत्याकांडाचा हायटेक तपासही करण्यात येत असून, मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास परिसरातील मोबाइलचे सीडीआर काढण्यात येत आहे.
निमगडे कुटुंबातील सदस्यांकडून संशयिताची माहिती काढण्यात येत आहे. निमगडे यांना धमक्या मिळाल्या होत्या तर त्यांनी पोलिसांत तक्रार का केली नाही, हा प्रश्नही पोलिसांना भेडसावत आहे. गत ३६ वर्षांपासून सिद्दिकी व निमगडे यांच्यात भूखंडाचा वाद सुरू होता.
रस्त्यासाठी दिले ६० लाख
या भूखंडामागे पायोनिअरची स्किम आहे. सिद्दिकी यांच्या जागेतूनच या स्किममध्ये रस्ता काढण्यात आला. रस्ता काढण्यासाठी नायर यांनी सिद्दिकी यांना ६० लाख रुपये दिले होते, अशी माहितीही तपासादरम्यान समोर आली आहे.
दत्तक योजना अपयशी
पोलिसांनी मोठा गाजावाजा करीत गुंडांसाठी दत्तक योजना आखली होती. या योजनेद्वारे प्रत्येक गुंडाच्या हालचालींवर पोलिस लक्ष ठेवणार होते. मात्र या घटनेमुळे ही योजना अपयशी ठरल्याची चर्चा आहे. कोणत्या वेळी कोणता गुंड कुठे होता याची माहिती काढण्यात येत असताना यापूर्वीच ही माहिती पोलिसांकडे असायला हवी होती,असेही जाणकारांचे म्हणणे आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट