'शासन आपल्या दारी' या महाराष्ट्र शासनाच्या योजनेअंतर्गत गुंठेवारी कायद्यान्वये नियमित अभिन्यासातील भूखंडांचे नियमितीकरण करण्यासाठी विशेष शिबिराला सुरुवात झाली आहे. उत्तर नागपूर, दक्षिण-पश्चिम नागपूर, पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी शिबिर भरविण्यात आले असून ८ सप्टेंबरपर्यंत हे शिबिर चालणार आहेत.
उत्तर नागपूर मतदारसंघात महात्मा फुले समाजभवन येथे ६ ते ७ सप्टेंबरपर्यंत शिबिर घेण्यात आले. नारा, नारी, बिनाकी, वांजरा, वांजरी, जरीपटका या भागातील नागरिकांनी याचा लाभ घेतला. दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील सोमलवाडा, चिंचभवनसाठी महालक्ष्मी मंदिर, मधुबन सोसायटी येथे शिबिर घेण्यात येत असून ८ सप्टेंबरपर्यंत नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे. पूर्व नागपूर मतदारसंघातील भारतवाडा, चिखली (देवस्थान), कळमना, हिवरी, वाठोडा, पारडी, भांडेवाडी, पुनापूरसाठी पूर्व नागपुरातील नासुप्रच्या विभागीय कार्यालयात ८ सप्टेंबरपर्यंत हे शिबिर आहे. नियमित अभिन्यासाचे नाव, खसरा क्रमांक व मौजानिहाय माहिती नासुप्रच्या मुख्यालयात व विभागीय कार्यालयात उपलब्ध आहे.
तसेच नासुप्रच्या संकेत स्थळावर (www.nitnagpur.org) देखील उपलब्ध राहील. तसेच ज्या प्रकरणात काही तांत्रिक अडचणी, न्यायालयीन प्रकरण, मालकी हक्काचे वाद असतील अशा भूखंडाबाबत निर्णय स्वतंत्रपणे घेण्यात येईल. ठरलेल्या दिवशी ठरलेल्या मौजामधीलच जनतेने यावे. अनावश्यक गर्दी व गैरसोय टाळावी असे आवाहन नासुप्रकडून करण्यात आले आहे.
ही होणार कामे
गुंठेवारी अंतर्गत नियमित अभिन्यासातील उर्वरित भूखंडाचे आवेदन स्वीकारणे
गुंठेवारी अंतर्गत नियमित अभिन्यासातील मागणी पत्र वितरण
गुंठेवारी अंतर्गत नियमित अभिन्यासातील नियमितीकरण पत्र वितरण
गुंठेवारी अंतर्गत मागणी पत्राप्रमाणे पे-ऑर्डर/डीडीद्वारे स्वीकारण्यात येईल
मागणी पत्र व नियमितीकरण पत्र देण्याकरिता / वितरण करण्याकरिता आवश्यक दस्तावेजाची पूर्तता करणे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट