आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास गंभीर व्यक्तीला रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिकाच लाइफलाइन ठरत असते. त्यासाठी शहरात रुग्णवाहिकांचे पेव फुटले आहे. दर मिनिटाला रस्त्यावर खासगी रुग्णवाहिका धावताना दिसतात. यातल्या अनेक रुग्णवाहिका अकारण सायरन वाजवत फिरत असतात. ही बाब आता नित्याचीच झाली असताना रुग्णवाहिका चालकांची दादागिरीदेखील आता बळावत चालली आहे. त्याची प्रचीती मेयो रुग्णालयात येत आहे. येथील डॉक्टरांच्या पार्किंगवर या रुग्णवाहिका चालकांनी अतिक्रमण केले आहे. जाब विचारणाऱ्यांना हे चालक दमदाटी करीत असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत.
मेयो-मेडिकलमधील अनेक रुग्णवाहिका बंद आहेत. मेडिकलमध्ये नर्सिंग होस्टेलमध्ये पाच रुग्णवाहिका भंगारात पडून आहेत. मेयोतदेखील हीच स्थिती आहे. यामुळेच मेयो-मेडिकलमध्ये खासगी रुग्णवाहिकांचा सुळसुळाट आहे. खासगी रुग्णवाहिका सरकारी रुग्णालयाच्या आवाराच्या बाहेर असाव्यात, असा नियम आहे. मेडिकलमध्ये अधिष्ठात्यांनी हे नियम कडक केले. परंतु, मेयो परिसरात डॉक्टरांची वाहने उभी ठेवण्याच्या पार्किंग झोनमध्येच खासगी रुग्णवाहिकांचा थांबा आहे.
जिल्हा एड्स नियंत्रण कार्यालयाच्या आवारात रुग्णवाहिका भंगारात पडून आहेत. सरकारी रुग्णालयातील रुग्णवाहिका मोठ्या प्रमाणात बंद असल्यामुळेच उपराजधानीत खासगी रुग्णवाहिकांचे पेव फुटले आहे. पाच वर्षांपूर्वी केवळ १९७ रुग्णवाहिकांची नोंद होती. मात्र, अलीकडे ही संख्या एक हजारावर पोहोचली आहे. प्रत्येक खासगी रुग्णालयाकडे रुग्णवाहिका आहे. सरकारी रुग्णालयातील रुग्णवाहिका मोठ्या प्रमाणात आजारी असल्यामुळेच खासगी रुग्णवाहिकाचा आधार रुग्णांना असतो. परंतु, रुग्णवाहिकांसाठी १५ रुपये किलोमीटरप्रमाणे भाडे निश्चित करण्यासंदर्भात धोरण ठरवण्यात यावे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
डॉ. आंबेडकर रुग्णालयात शोभेची वस्तू
उत्तर नागपुरातील डॉ. आंबेडकर रुग्णालयात भेट मिळालेली रुग्णवाहिका प्रवेशद्वारावर उभी असते. ही नवीन रुग्णवाहिका आहे. परंतु, चालक नसल्याने ती अद्याप रस्त्यावर धावलीच नसल्याने शोभेची वस्तू बनली आहे. याउलट स्थिती शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाची आहे. येथे उधारीवर चालक आणावा लागतो.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट