विदर्भाच्या मुद्द्यावर माजी आमदार अॅड. वामनराव चटप आणि इतर मान्यवरांतर्फे मुंबईत आयोजित पत्रपरिषद उधळून लावण्याच्या कृतीची विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांनी कडक शब्दांत निंदा केली आहे.
राज ठाकरेंना विदर्भाचा मुद्दासुद्धा नीट माहिती नाही. असे असताना त्यांच्या पक्षाने केलेली ही कृती अत्यंत भ्याड असल्याचे मत धोटे यांनी व्यक्त केले आहे. उद्धव आणि राज्य ठाकरे यांना त्यांचे कुटुंब नीट सांभाळता आलेले नाही, त्यांनी राज्य सांभाळण्याची गोष्टी करू नयेत, असा टोलाही धोटे यांनी लगावला आहे.
'लहान राज्यांचे वाद हे देशात सर्वदूर आहेत. राज ठाकरेंचा यावर अभ्यास नाही. त्यांना महाराष्ट्रातील जनतेनेच नाकारले आहे. त्यामुळे असली काही कृत्ये करून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. उत्तर भारतीयांच्या पाणीपुरीच्या ठेल्यांवरील सामान फेकणारे मनसेचे कार्यकर्ते किती शूर आहेत, हे राज्याने बघितले आहेच. त्यातच पत्रकार परिषद उधळून लावण्याचे लोकशाही विरोधी कृत्य त्यांनी केले आहे', असे मत धोटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून व्यक्त केले. मनसेच्या या कृत्याबद्दल निषेध करण्यात आला असून संविधान चौकात पक्षाचा झेंडाही जाळण्यात आला. नीतेश राणे यांनीही काही दिवसांपूर्वी विदर्भवाद्यांचे हात-पाय मोडण्याची भाषा केली आहे. यावर धोटे म्हणाले, 'विदर्भातील जनता केवळ शाब्दीकच नाही तर मैदानी उत्तर देण्यासुद्धा सक्षम आहे.'
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट