वाहतूक पोलिसांनी गाडी थांबविल्यास परवाना आणि गाडीची कागदपत्रे दाखविणे अनिवार्य असते. तसा नियमच आहे. परंतु, आजकालच्या काळात प्रत्येकच गोष्ट मोबाइल अॅपवर मिळू लागलेली आहे. त्यामुळे याकरितासुद्धा आता मोबाइल अॅप आणण्याचा विचार सरकार करीत आहे. त्याकरिता सरकार मोटार वाहन कायद्यात योग्य ते बदलसुद्धा करणार आहे. परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी ही माहिती दिली.
याबाबत गेडाम म्हणाले, 'कायद्याप्रमाणे परवाना आणि गाडीची कागदपत्रे सोबत बाळगणे अनिवार्य आहे. परंतु, नागरिकांना ते सोबत बाळगण्याची गरजच पडू नये, असा विचार सुरू आहे. त्याकरिता मोबाइल अॅप तयार करण्यात येणार आहे. या अॅपवर एका व्यक्तीच्या नावाने असलेल्या सगळ्या गाड्यांचे क्रमांक आणि त्याचा परवाना याची माहिती राहील. त्यामुळे वाहतूक पोलिसांना हे अॅप दाखविल्यास नागरिकांना या गोष्टी स्वतंत्ररित्या बाळगण्याची गरज नाही. येत्या काही महिन्यांतच हे अॅप सुरू करण्यात येणार आहे. त्याकरिता कायद्यात योग्य ते बदल करण्यात येत आहेत.'
तसेच हायसीक्युरिटी नंबर प्लेट संदर्भात बोलताना ते म्हणाले, 'निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या होत्या. परंतु, दरम्यानच्या काळात या प्लेटवरील 'चिप'ला घेऊन हरकत घेण्यात आली. यामुळे पुन्हा नव्याने निविदा काढाव्या लागल्या. या मोठ्या रकमेच्या निविदा असल्याने सध्या मुख्य सचिवांकडे आहेत. लवकरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.'
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट