देऊळगाव राजा तालुक्यातील बायगाव खुर्द, सिनगाव जहाँगीर व मंडपगाव येथील २३ शेतकऱ्यांच्या संपादित जमिनीची वाढीव रक्कम दोन वर्षापासून न दिल्याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश येथील दिवाणी न्यायालयाने दिले आहेत. या आदेशावरून शुक्रवारी शेतकरी व बेलिफ मालमत्ता जप्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असता उपविभागीय अधिकारी खांदे यांनी १५ दिवसांत शेतकऱ्यांची थकीत रक्कम देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे जप्तीची नामुष्की टळली.
देऊळगाव राजा तालुक्यातील बायगाव खुर्द, सिनगाव जहॉंगीर व मंडपगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनी २०००मध्ये खडकपूर्णा प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्या होत्या. काही शेतकऱ्यांना संपादित जमिनीचा मोबदला देण्यात आला. परंतु दोन वर्षांपासून या शेतकऱ्यांची सात कोटी रुपयांची रक्कम थकीत आहे. सदर वाढीव रक्कम मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी भूसंपादन विभागाचे उंबरठे झिजविले. परंतु त्यांना आश्वासनाखेरीज काहीच मिळाले नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी सदर प्रकरण न्यायालयात दाखल केले. प्रकरणी न्यायालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाची चल-अचल संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले. या आदेशावरून बेलिफसह शेतकरी संपत्ती जप्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. परंतु जिल्हाधिकारी एका मिटिंगसाठी नागपूरला गेल्याचे समजताच शेतकऱ्यांची उपविभागीय अधिकारी कार्यालय गाठून थकीत पैशाची मागणी केली. त्यानंतर उपविभागीय खांदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी फोनद्वारे सपंर्क साधून त्यांना या बाबतची माहिती दिली. त्यानंतर येत्या १५ दिवसांत थकीत रक्कम देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट