नागपूर ः काँग्रेसने बुडवले, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांचे विधान म्हणजे महापालिका, जिल्हा परिषद व नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांचे वेध सुरू होताच पूर्वनियोजित राजकारणाला सुरुवात करण्याचे संकेत आहेत. प्रत्यक्षात शरद पवार यांनीच उपराजधानीचे नुकसान केल्याचा आरोप विदर्भ माझाचे प्रमुख राजकुमार तिरपुडे यांनी लावला.
पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी विशेषतः शरद पवार यांनी नागपूरला फक्त नावाची उपराजधानी ठेवली. सिंचन, उद्योग वा रोजगाराच्या संधी विदर्भात तयार झाल्या नाही. उलट निधी परत गेला. विदर्भाचा वसाहत म्हणून वापर करण्यात आला, अशी टीकाही तिरपुडे यांनी एका पत्रपरिषदेत केली. विदर्भातील ९० टक्के जनतेला वेगळे राज्य हवे. वेगळ्या राज्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या सर्व निवडणुका लढण्यात येतील. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ४७ नगरपालिका निवडणुकीसह जानेवारी-फेब्रुवारीतील महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकाही लढणार आहोत. विदर्भ अजेंड्यावर नाही, असा पवित्रा घेऊन भाजपने भूमिका बदलवली. काँग्रेसने विदर्भाचे समर्थन केले नाही तर, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसे हे विदर्भ विरोधी आहेत. नवीन पर्याय म्हणून विदर्भ माझा जनतेच्या दरबारात उतरणार आहे. ही लढाई आता बॅलेटद्वारे लढण्यात येईल, असा निर्धारीही तिरपुडे यांनी व्यक्त केला.
--सर्वधर्म समभाव परिषद
महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबरला सर्वधर्म समभाव परिषद आयोजित करण्यात येत आहे. सर्व धर्माचे प्रमुख यात सहभागी होतील, मिरवणूक काढण्यात येईल, असेही राजकुमार तिरपुडे यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट