'ज्या भारतात स्वामी विवेकानंदांसारख्या विभूती जन्मल्या, ज्या भूमीत माझ्या आईवडिलांनी त्यांच्या अस्थी विसर्जित करण्याची इच्छा बोलून दाखवली, ज्या देशात सर्व धर्म, भाषा, पंथांचे लोक एकत्र नांदतात, त्या भारतात जन्मल्याचा मला अभिमान आहे', अशा शब्दांत प्रसिद्ध सिनेअभिनेते पद्मश्री टॉम ऑल्टर यांनी भावना व्यक्त केल्या.
भारतभूमी, धर्माविषयीचे स्वामी विवेकांनदांचे विचार सांगताना, आईवडिलांच्या आठवणींना उजाळा देताना बरेचदा टॉम ऑल्टर भावूक झाले. स्वामी विवेकानंदांचे शिकागो परिषदेत १२३ वर्षांपूर्वी झालेले भाषण सहकारी उदयचंद्र यांच्याद्वारे सादर करीत तसेच शेरोशायरीची पाखरण करत टॉम ऑल्टर यांनी अस्खलित हिंदीत भाषण करून दीक्षांत सभागृहात मोठ्या संख्येने उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने आयोजित मौलाना अब्दुल करीम पारेख स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत टॉम ऑल्टर यांचे शुक्रवारी 'युनिटी इन डायव्हर्सिटी - द जॉय, द चॅलेंज' विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे होते तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम व मौलाना वजीद पारेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
टॉम ऑल्टर यांनी व्याख्यानाचा आरंभच स्वामी विवेकानंदांच्या नामोल्लेखाने केला. स्वामीजींचे शिकागो परिषदेतील भाषण पणजोबांनी ऐकले आणि आईला सांगितले तेव्हापासून तिची भारतात यायची इच्छा होती.
कालांतराने ती वडिलांसोबत भारतात आली. नशिबाने माझा भारतात जन्म झाला. त्याचे संपूर्ण श्रेय स्वामीजींना जाते, असे टॉम ऑल्टर यांनी सांगितले. 'वडील ईसाई असूनही बायबल उर्दूमध्ये वाचायचे. हिंदू मंदिरे, गंगा, यमुनेच्या तीरावर राहायचे, असे दुसऱ्या कोणत्याही देशात घडत नाही. भारताच्या भूमीत प्रत्येक जातीधर्माच्या लोकांसाठी जागा आहे. या देशाचे हे भारतीयत्व प्रत्येकाने जबाबदारीने जपले पाहिजे', असे आवाहनही त्यांनी केले. टॉम यांचे भाषण ऐकल्यानंतर धर्मनिरपेक्ष असलेल्या आपल्या भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याचे डॉ. काणे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
प्रास्ताविक वजीद पारेख, सूत्रसंचालन प्रमोद शर्मा यांनी केले. आभार पूरण मेश्राम यांनी मानले.
टॉम ऑल्टर यांचे आज 'परछाईयाँ'
टॉम ऑल्टर यांचा 'परछाईयाँ' हा नृत्य, संगीत आणि संवादाचा कार्यक्रम शनिवार, १७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. चिटणवीस सेंटरच्या मुद्रा उपक्रमांतर्गत सायंकाळी ७ वाजता बनयान सभागृह, चिटणवीस सेंटर येथे हा कार्यक्रम होईल. सत्यजित राय यांचा 'शतरंज के खिलाडी' चित्रपटातील तसेच, 'क्रांती' चित्रपटातील ब्रिटिश पोलिस अधिकाऱ्याची अॉल्टर यांची भूमिका चांगलीच गाजली होती. 'परछाईयाँ'मध्ये टॉम ऑल्टर गीतकार व शायर साहिर लुधियानवी यांच्या कार्याचा प्रवास उलगडतील.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट