गणपतीच्या निमित्ताने वाढलेली मागणी, यामुळे हलके घसरलेले डाळींचे दर गेल्या पंधरवड्यात पुन्हा वाढले आहेत. दरांची ही वाढ दिवाळीपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे. भाज्या सध्या स्थिर असल्या तरी एकूणच दिवाळीनंतर बाजारात खरी स्वस्ताई दिसण्याची आशा निर्माण झाली आहे.
आयातीत झालेल्या वाढीमुळे डाळींचा हब असलेल्या नागपूरसह विदर्भात दरात घसरण झाली होती. मागीलवर्षी २०० रुपये किलोला उपलब्ध असलेली तूरडाळ दोन वर्षांच्या नीचांकावर पोहोचून ९० रुपयांवर आली होती. तर हरभरा डाळदेखील अनेक महिन्यांनंतर १०० रुपयांच्या खाली घसरली होती. पण, आता पुन्हा दरात हलकी वाढ झाली.
'सध्या आयातीत डाळींची आवक भरपूर वाढली आहे. यासोबतच देशी डाळीचादेखील जुना माल बाजारात येत आहे. त्यामुळे दर घसरले होते. पण, आता गणेशोत्सवामुळे मागणीत वाढ झाली आहे. सोबतच पुढचे सगळे दिवस हे सणांचे आहेत. यामुळे दरात मोठी मागणी अपेक्षित आहे. त्यातून सध्या दर वाढले आहेत. मूगडाळ सोडल्यास सर्व डाळी पुन्हा शंभरीपार गेल्या आहेत. ही दरवाढ आणखी दीड महिना कायम राहण्याचा अंदाज आहे', असे इतवारी ग्रेन किराणा मर्चंट्स असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी यांनी सांगितले.
दुसरीकडे सणवार आले तरी भाज्यांचे दर मात्र स्थिर आहेत. सर्वच भाज्या सरासरी २० ते ३० रुपये किलोवर आहेत. कांद्याचे दर तर विक्रमी नीचांकावर आहेत. 'यंदा कांद्याचे उत्पादन चारपट अधिक झाले आहे. नागपूरच्या बाजारात रोज ३० गाड्या कांदा येत असताना मागणी अर्धीदेखील नाही. यामुळे दरात घट होऊन घाऊक बाजारात तो जेमतेम दोन ते सहा रुपये किलोने उपलब्ध आहे. येत्या काळात बटाट्याचा नवीन मालदेखील बाजारात येणार आहे. यामुळे दरात घट अपेक्षित आहे', असे कळमन्यातील घाऊक व्यापारी मोहम्मद मुन्सिफ यांनी सांगितले.
यंदा पावसाने ऑगस्ट महिन्यापासून उघडीप दिली. जुलै महिन्यात चांगला पाऊस पडला होता. तोच काळ भाज्यांसह अन्य धान्याचे पीक बहरण्यासाठी महत्त्वाचा असतो. त्या काळात पेरलेली पिके आता ऑक्टोबरपासून बाजारात येतील. जुलैच्या चांगल्या पावसामुळे यंदा सर्वच पिके चांगली असण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. यामुळेच काही ठराविक धान्याचे दर सर्वसामान्यांसाठी सध्या वाढलेले असले तरी दिवाळीनंतर त्यात घट होईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
बाजारातील क्षणचित्रे
मागणी वाढल्याने डाळी पुन्हा वधारल्या
तूरडाळ, हरभरा डाळ शंभरी पार
मूग, वाटाणा आणि लाखोळी डाळ घसरली
साखरेचे दर उच्चांकावर स्थिर
भाज्यांचे दर स्थिर
कांद्याचे घाऊक दर विक्रमी नीचांकावर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट