अॅट्रोसिटी कायदा रद्द करावा किंवा नाही, हा अभ्यासाचा विषय आहे. मात्र, या कायद्याचा दुरुपयोग होत असेल तर कडक शिक्षा निश्चितच व्हायला हवी, असे नमूद करताना चौफेर अभ्यास करूनच अॅट्रोसिटी कायद्याबाबत निर्णय घ्यावा, जेणेकरून कोणावरही अन्याय होणार नाही, असे स्पष्ट मत प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी मांडले.
मराठ्यांच्या आक्रोशाला जातीव्यवस्थेवर भाष्य करणारा 'सैराट' चित्रपट कारणीभूत आहे असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला होता. त्याबाबत बोलताना आठवले निव्वळ गमतीचा विषय आहे, अशी टीका मंजुळे यांनी केली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे गुरुनानक भवनात राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक स्पर्धा आणि क्रीडा स्पर्धेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा रविवारी सत्कार करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंजुळे बोलत होते. मंजुळे म्हणाले, 'सैराट' चित्रपट बघितल्यानंतर तेथून बोध घेण्याची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी असू शकते. मात्र, चित्रपटाची भाषा ही संवादी आणि प्रभावी आहे. याची प्रचिती सैराटवरून येते. विद्यापीठाच्या शिक्षणापलीकडेही जग आहे. तुम्ही त्यासाठी 'सैराट' व्हावे, म्हणजे आपोआप मार्ग सापडतील.'
'शिक्षणामुळे माणूस घडतोय, असे म्हणतात. पण, शिक्षणच जगणे नव्हे. तर खेळ, साहित्य, कलेतूनही उत्कृष्ट माणसाची निर्मिती होत असते. शिक्षणाशिवायही जगात बरेच काही आहे. हे जगण्याचे विद्यापीठ प्रचंड मोठे आहे', असे मत मंजुळे यांनी मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सिध्दार्थविनायक काणे होते. यावेळी क्रीडा क्षेत्रातील ६०, सांस्कृतिक ४२ आणि राष्ट्रीय सेवा योजनेतील २१ विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम, सेवा योजनेचे समन्वयक डॉ. भाऊ दायदार, विद्यार्थी कल्याणचे संचालक डॉ. निहाल शेख, शारीरिक शिक्षण विभागाचे प्रभारी संचालक प्रा. रवींद्र पुंडलिक उपस्थित होते. संचालन रेणुका देशकर, शरद सूर्यवंशी, शुक्ला यांनी केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट