ऑटोमोटिव्ह चौक ते मिहान आणि प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर अशी ३८ किलोमीटर मेट्रो रेल्वे नागपुरातील विविध मार्गांवर धावणार आहे. यातील ३३ किलोमीटरचा मार्ग एलीवेटेड म्हणजे जमिनीच्यावरून आणि ४ किमीचा मार्ग जमिनीच्या समांतर आहे. असे नियोजन केले असताना आता कस्तूरचंद पार्कपासून मेट्रो रेल्वे भूमिगत करण्याचा विचार वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
'असोसिएशन ऑफ कन्सल्टींग सिव्हिल इंजिनीअर्स (इंडिया) यांच्या नागपूर शाखेच्यावतीने अभियंतादिनाच्यानिमित्ताने सायंटिफिक सभागृहात 'मेट्रो रेल व नागपूरचा विकास' या संकल्पनेवर आधारित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एनएमआरसीएलचे ( नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि.) जनसंपर्क अधिकारी शिरीष आपटे, मैत्रिबन प्रकल्पाचे रवी गंधे आदी यावेळी उपस्थित होते.
कस्तूरचंद पार्क परिसरात रिझर्व बँक, विधिमंडळाची इमारत अशा वास्तू आहेत. त्यामुळे कस्तूरचंद पार्क परिसरात एलीवेटेड मेट्रो नेली तर अनेक अडचणी येऊ शकतात. यावर तोडगा म्हणून मेट्रो रेल्वे भूमिगत करण्याचा विचार सुरू असल्याचे गडकरी म्हणाले. सुमारे ३० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प नागपूर होऊ घातले आहेत. यातील सर्वांत महत्त्वाचे प्रकल्प म्हणून मेट्रो रेल्वेकडे बघितल्या जात आहे.
रेकॉर्डब्रेक वेळात हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. डिसेंबर २०१८ पर्यंतचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असले तरी जानेवारी २०१८ पर्यंत मेट्रो धावेल, या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचे गडकरी म्हणाले. अनेक प्रकल्प व्यवस्थेतील दोषामुळेच रखडतात. भूसंपादनाच्या वेळी देणाऱ्या अडचणीही मेट्रो रेल्वे प्रकल्पात येणार नाही. ज्यांची जमीन जाणार, त्यांना चांगला मोबदला दिला जाणार असल्याचे गडकरी म्हणाले.
पहिली ट्रायल डिसेंबरमध्ये
मेट्रो रेल्वेचा खर्च २० टक्क्यांनी कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहे. महागडे सिमेंट अवघे १२०, १३० ते १४० रुपये बॅग किमतीत मिळत आहे. अनावश्यक खर्च टाळण्याच्या सूचना एनएमआरसीएलला दिल्या आहेत. सोलरच्या माध्यमातून ६५ टक्के वीज उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. डिसेंबरपर्यंत एअरपोर्ट ते मिहान मार्गावर मेट्रो रेल्वेची पहिली ट्रायल घेण्याचे नियोजन असल्याचे गडकरी यांनी सांगितले. शहरातील अपघात स्थळांना शोधून त्यात सुधारणा करण्यात येणार आहे. विदर्भातील पर्यटनाला जोडण्यासाठी फ्लोटिंग बोट सुरू करण्याचेही नियोजन असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
...तरच मेट्रो फायद्यात!
ऑटोमोटिव्ह चौक ते मिहान आणि प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर या मार्गावरच मेट्रो धावली तर मेट्रो तोट्यात जाईल. मेट्रो फायद्यात चालावी, असे वाटत असेल तर मेट्रोच्या मार्गांचा विस्तार करणे आवश्यक आहे. कामठी, कन्हान, डिफेन्स, हिंगणा, बुटीबोरी इथपर्यंत मेट्रो नेली तर मेट्रोला मोठ्या प्रमाणात प्रवासी मिळेल, असा विश्वासही गडकरींनी बोलून दाखविला. या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
ऑरेंज सिटी स्ट्रीटवर मेट्रिनो
गुडगाव येथे मेट्रिनो सुरू करण्याचा प्रयोग राबविण्यात येत आहे. प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणारा हा प्रयोग नागपुरातील ऑरेंज सिटी स्ट्रीटवर राबविण्यात येणार आहे. मेट्रो रेल्वेसाठी प्रत्येक किलोमीटरला ३०० कोटी रुपयांचा खर्च आहे. यापेक्षा मेट्रिनोला ५० कोटींचा खर्च येईल. त्यामुळे वर्धा मार्गावरून हिंगणा मार्गावर जोडण्यासाठी ऑरेंज सिटी मार्गावर मेट्रिनो धावण्याचे नियोजन सुरू असल्याचे गडकरी म्हणाले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट