म. टा. प्रतिनिधी, नागपूर
जगभरात मृत्यूला कारण ठरणाऱ्या अनेक गंभीर आजारांचे माहेरघर म्हणून मधुमेह कुख्यात आहे. त्यामुळे एकदा का, या मधुमेहाने दस्तक दिली, की आयुष्यभर काळजी घेणे हाती शिल्लक राहते. सामान्य व्यक्तीपेक्षा मधुमेहींना हार्ट अटॅकची जोखीम तिपटीने वाढते. त्यामुळे दिनचर्येत बदल करण्याशिवाय गत्यंतर नाही, हे मधुमेहींनी लक्षात ठेवायला हवे, असा सूर रविवारी येथे व्यक्त करण्यात आला.
डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडियाच्या नव्या कार्यकारिणीच्या पदगृहणानिमित्त मधुमेह व्यवस्थापनावर एक दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी तज्ज्ञांनी साधलेल्या संवादातून हा सूर उमटला.
प्रारंभी मधुमेह उपचारात आलेल्या अद्ययावत औषधांवर प्रकाश टाकताना पुणे येथील डॉ. सुहास एरंडे म्हणाले, आठ प्रकारे हा मधुमेह नियंत्रणात राहू शकतो. संतुलित आहारामुळे वजन नियंत्रणात राहते. मोजका सकस आहार रक्तातल्या शर्करेला नियंत्रित ठेवतो. आहारात तेलाचे प्रमाण आणि कामातला ताण कमी केला तरीही मधुमेह आवाक्यात राहतो. त्यांचा हा धागा पकडून डॉ. नितीन कर्णिक म्हणाले, मधुमेहींमध्ये संसर्गजन्य आजारांची जोखीम अधिक असते. मधुमेहींनी कान, डोळे, नसांचे आजार, गॅँगरीन आणि न्युमोनिया होण्याची जोखीम वाढते. अनेकदा रुग्णांना झालेले फंगस इन्फेक्शन डॉक्टरांनादेखील ओळखू येत नाहीत.
या विषयावर आणखी प्रकाश टाकताना संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अजय कडुसकर म्हणाले, सामान्य व्यक्तींमध्ये शेकडा ७ जणांना हार्ट अटॅकची शक्यता असते. मधुमेहींमध्ये हेच प्रमाण शेकडा ३० टक्क्यांपर्यंत जाते. शिवाय मधुमेहींच्या किडनी, डोळ्यांवरही ताण येतो. त्यामुळे अनेक गंभीर आजारांचे माहेरघर म्हणूनही मधुमेह कुख्यात आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट