म. टा. प्रतिनिधी, नागपूर
नसिरुद्दीन शहा, ओमपुरी, निळू फुले, श्रीराम लागू या ज्येष्ठ कलावंतांपासून ते नागराज मंजुळे, सचिन कुंडलकर, अतुल पेठे, अगदी आताचा दिग्दर्शक संदेश कुळकर्णी या तरुणांशीही ज्योती सुभाष यांची घट्ट 'दोस्ती' आहे. 'कोणत्याही वयातील व्यक्तीशी दोस्ती करू शकण्याचा गुण माझ्यात आहे. कोणताही शिष्टाचार न पाळता तरुणांसोबत माझी दोस्ती होते. ही प्रतिभावंतांची तरुण पिढीही मला मानते. दोस्ती बडी प्यारी चिज है', असे म्हणत प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी त्यांच्या विशेष 'दोस्ती'चे नाते उलगडले.
ऑरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांच्या शृंखलेअंतर्गत विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात मुलाखतकार अजेय गंपावार यांनी ज्योती सुभाष यांना नाटक, सिनेमा, मालिका, ज्येष्ठांसह तरुणांशी असलेली मैत्री अशा विविध विषयांवर बोलते केले.
एलकुंचवार द ग्रेट
महेश एलकुंचवारांचे 'आत्मकथा' हे नाटक ज्योती सुभाष यांनी केले होते. त्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, 'त्यांचे नाटक करायला मिळाले, हे मी माझे भाग्य समजते. नातेसंबंधांमधील तानेबाने त्यांनी नाटकांत बारकाईने गुंफलेले असतात. त्यांचे नाटक करणे म्हणजे व्यक्तिगत पातळीवर तो एक मोठा आव्हानात्मक आणि तितकाच आनंद अनुभव असतो.'
पहिले दिग्दर्शक निळूमामा
आई-वडील राष्ट्रसेवादलात असल्यामुळे नाटकासोबत सामाजिकतेचेही भान कसे आले, हे सांगताना ज्योती सुभाष यांनी निळू 'मामा' फुले यांच्याशी असलेले नातेही उलगडले. 'निळूमामांचा लहानपणापासून सहवास लाभल्यामुळे अभिनयाचे बाळकडू मिळाले. ते माझे पहिले दिग्दर्शक होते. कलात्मकता आणि उत्स्फूर्तता त्यांच्याकडून शिकायला मिळाली', असे ज्योती सुभाष म्हणाल्या.
रंगभूमीला पडलेले स्वप्न
'डॉ. श्रीराम लागू म्हणजे रंगभूमीला पडलेले एक सुंदर स्वप्न आहे. त्यांच्यासोबत काम करायला मिळाले, यासाठी मी स्वतःला नेहमीच भाग्यशाली समजत आलेली आहे. माझ्यावर ज्यांचा प्रभाव आहे, त्यापैकी लागू हे एक आहे. नाटकावर प्रेम कसे करावे, हे लागूंकडून शिकायला पाहिजे', असे त्या म्हणाल्या.
खंत आणि समाधानही
ज्योती सुभाष या भरतनाट्यममध्ये पूर्वी पारंगत होत्या. पण अभिनयाकडे वळल्यामुळे त्यांचे नृत्य राहून गेले. शिवाय, गळ्याकडेही दुर्लक्ष झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 'माझा आवाज चांगला आहे. त्यावेळी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घ्यायला हवे होते. पण ठिक आहे. माझा हा वारसा माझी मुलगी अमृता चालवते आहे. तिला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती गाणे शिकते,' असे ज्योती सुभाष म्हणाल्या. प्रारंभी ऑरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या वेबसाइटचे ज्योती सुभाष यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. त्यानंतर शॉर्ट फिल्म स्पर्धेची घोषणा करण्यात आली. राष्ट्रभाषा परिवारच्या वतीने ज्योती सुभाष यांचा सत्कार करण्यात आला. अर्पिता भगत यांची संकल्पना व राष्ट्रभाषा परिवारतर्फे तयार करण्यात आलेल्या 'डिव्हाइन थिएटर'चे शेवटी सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृषाली देशपांडे यांनी केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट