महाराष्ट्र वन विभागाने १ जुलै रोजी राबविलेल्या महावृक्षारोपण अभियानाची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात तब्बल २ कोटी ८१ लक्ष ३८ हजार ६३४ रोपे लावण्यात आली असून लिमका बुकने या अभियानाची दखल घेतली आहे.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून राज्यात १ जुलै रोजी २ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला होता. वन विभागासह विविध संस्था, संघटना तसेच शाळा यांच्या सहकार्याने हे वृक्षारोपण राज्यभर करण्यात आले होते. या अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वनविभागाने वृक्ष लागवडीसंदर्भात नव्या विक्रमाची नोंद केली आहे.
वनविभाग तसेच सामाजिक वनीकरण विभागाने राज्यात १२ तासांत लोकसहभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली होती. राज्यात या अभियानांतर्गत १५३ प्रकारच्या प्रजातींच्या रोपांची लागवड केली गेली. ६५ हजार ६७४ जागांवर तब्बल ६ लाख १४ हजार ४८२ लोक या अभियानात सहभागी झाले होते. सन २०१६-१७ या वर्षीचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात वनाच्छादन वाढावे, या दृष्टीने राज्यात २ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प जाहीर केला होता. वृक्ष लागवडीच्या या महामोहिमेसाठी वनविभागासह शासनाच्या इतर २० विभागांचा सहभाग त्यांनी मिळविला. या प्रक्रियेत लोकसहभाग वाढावा व विशेषतः तरुणाईचा सहभाग वाढावा, यासाठी सेल्फी विथ ट्री सारखी अभिनव स्पर्धादेखील घेण्यात आली होती.
पुढील तीन वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प आता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केला असून, त्यादृष्टीने तयारीलादेखील सुरुवात करण्यात आली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट