'दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांचे स्मरण करणेही आजच्या राजकारणात गुन्हा ठरू शकतो. त्यांच्याइतके स्वच्छ राजकारण कुठल्याच पक्षात व नेत्यात राहिलेले नाही. यामुळे आज जर दीनदयालजी असते तर त्यांनी स्वत:चे डोकेच फोडून घेतले असते', अशी चिंता माजी केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ खासदार डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी व्यक्त केली.
दीनदयाल सहकारी प्रत्यय संस्थेतर्फे दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत रविवारी शिक्षक सहकारी बँकेच्या महाल येथील सभागृहात मुरली मनोहर जोशी यांचे व्याख्यान झाले. त्यात त्यांनी दीनदयाल यांचे व्यक्तीमत्त्व किती साधे व सरळ होते, याबाबत विवेचन केले.
'दीनदयाल उपाध्याय हे मुळातच अतिसामान्य होते. राजकारणातील त्यांच्या साधेपणाचा अभ्यास केल्यास आजचे नेते त्यांच्या विचारसरणीच्या विरुद्ध वागत असल्याचे दिसून येईल. यामुळे त्यांचे विचार समजून घेणे हा आजच्या राजकारणात गुन्हाच ठरेल. आजच्या प्रवाहाच्या विरोधात जाणारे त्यांचे विचार आहेत. पण, बदल करावयाचा असल्यास प्रवाहाच्या विरुद्धच जावे लागते. हे लक्षात ठेवायला हवे', असे आवाहन त्यांनी केले.
जोशी म्हणाले, 'दीनदयालजींनी संघ आणि जनसंघ यांची सरमिसळ कधीच केली नाही. पण तुमची विचारसरणी नेमकी कोणती? असे लोक त्यांना विचारत. उजवी, डावी, भांडवलवादी की समाजवादी. त्यावर ते आमची विचारसरणी राष्ट्रवादी पण राजकारणात मात्र राष्ट्रहिताला धरून असलेली यथार्थवादी, असे ते म्हणत. त्यांच्या या विचारांना अनेकदा परिवारातूनच विरोध झाला होता, हेदेखील लक्षात घ्यायला हवे.'
मुरली मनोहर जोशी यांनी यावेळी शरीर, जल, वायू, पर्यावरण हे सारे एकच असल्याचा विचारही मांडला. 'माझ्या शरीराचे मी काहीपण करेन, असे एक महिला म्हणाली होती. पण हे शरीर त्या महिलेचे कसे? ते काय बाजारातून विकत आणले. आई-वडिलांमुळे हे शरीर तिला मिळाले. याचप्रमाणे जल असो वा वायू अथवा पर्यावरण, हे तुमचे नाही. त्यांच्यामुळे तुम्ही आहात. याचा नाश करण्याचा अधिकार नाही. असेच सुरू राहिल्यास २०५०पर्यंत पिण्यासाठी पाणीदेखील मिळणार नाही, हा इशारा आहे. हे सारेकाही सृष्टीकेंद्रीत अर्थव्यवस्थेशी निगडीत असून तोच विचार दीनदयाल उपाध्याय यांचा आहे', असे डॉ. जोशी म्हणाले.
आमदार गिरीश व्यास यांनी अध्यक्षीय भाषणात दीनदयाल उपाध्याय यांच्याबाबत मुरली मनोहर जोशी यांच्याकडून ऐकता येणे हा एक योग असल्याच्या भावना मांडल्या. तर, संस्थेचे अध्यक्ष श्रीपाद रिसालदार यांनी संस्थेची माहिती दिली. माजी उपाध्यक्ष गोपाळदास दिसावल यांचे सुपुत्र डॉ. आशिष दिसावल व डॉ. कुमार शास्त्री यांच्या हस्ते जोशी यांना पुस्तक भेट देण्यात आले. तसेच दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनकार्यावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे पुरस्कार वितरणही यावेळी करण्यात आले. यावेळी संस्थेचे अॅड. विवेक सोनटक्के यांच्यासह भागधारक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट