शालेय शिक्षण विभागाने संच मान्यतेनंतर अतिरिक्त शिक्षक घोषित करण्याबाबत निर्णयाला शहरातील दहा नामवंत शाळांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठासमोर आव्हान दिले आहे. त्यावर सुनावणी करताना हायकोर्टाने संचमान्यतेवर यथास्थिती ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे शाळांना मोठा दिलासा मिळाला आहे.
न्यू इंग्लिश हायस्कूल, दाजीबाई देशमुख हायस्कूल, नवयुग विद्यालय, बच्छराज व्यास विद्यालय यासारख्या शाळांनी संच मान्यतेला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. त्यावर न्या. भूषण गवई आणि न्या. विनय देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पुढील निर्णयापर्यंत संच मान्यतेला यथास्थिती ठेवण्यात यावे, असा आदेश देण्यात आला.
याचिकाकर्त्या शाळांनुसार, शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात शिक्षकपदांना मान्यता देण्याचा निर्णय घेतला. परंतु, तसे करीत असताना नियमित विषय शिक्षक आणि विशेष शिक्षक (कला, शारीरिक शिक्षण, संगीत) यापैकी नेमके कोण अतिरिक्त ठरणार, त्याबाबत कोणतेही धोरण निश्चित केलेले नाही. याचिकाकर्त्या दहा शाळांमध्ये नियमित विषय शिक्षक आणि विशेष शिक्षकांची पदे यापूर्वीच मंजूर झालेली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते सेवा देत आहेत. परंतु, संच मान्यतेनंतर नेमक्या कोणत्या शिक्षकांना अतिरिक्त घोषित करावे, त्याबाबत संभ्रम आहे. नियमित शिक्षकांना अतिरिक्त केल्यास विशेष शिक्षकांना त्यांचा कार्यभार देता येत नाही, तसेच विशेष शिक्षकांना अतिरिक्त केल्या शाळांतील शिक्षणेतर उपक्रमांवर परिणाम होणार आहे, असे याचिकेत नमूद केले आहे.
ते आठ शिक्षक कोण?
न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये ५२ नियमित शिक्षक आणि चार विशेष शिक्षकांची पदे मंजूर केलेली आहेत. संचमान्यतेत राज्य सरकारने केवळ ४८ शिक्षकांची पदे मंजूर केलेली आहेत. त्यामुळे तब्बल आठ शिक्षक अतिरिक्त ठरतात. परंतु, ते आठ शिक्षक नेमके कोणते त्यावर स्पष्टता नाही. हीच परिस्थिती इतर शाळांमध्येही आहे. त्यामुळे संचमान्यतेला स्थगिती देण्यता यावी, नियमित शिक्षकांसोबतच विशेष शिक्षकांच्या पदांना मान्यता देण्यात यावी, अशी विनंती याचिकेत केली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. भानुदास कुळकर्णी यांनी बाजू मांडली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट