नागपूर : डब्बा बाजाराचा मास्टर माइंड असणाऱ्या रवी अग्रवाल याच्या डब्ब्यात अनेक पोलिस अधिकारी व नेतेही बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुन्हेशाखेच्या आर्थिक विभागाने या प्रकरणाचा सखोल तपास केल्यास डब्ब्यातून अनेकांची नावे बाहेर येऊ शकतात. परंतु, या प्रकरणात पोलिसांवरच दबाव आणण्यात येत असल्याची माहिती आहे.
नागपुरातून सुरू झालेल्या या अवैध बाजाराचे जाळे भारतासह विदेशातही असून, दुबई हे विदेशातील प्रमुख केंद्रापैकी एक असल्याचेही समजते. दरम्यान, १२ वर्षांपूर्वी रवी अग्रवाल हा सामान्य होता. केवळ १२ वर्षांतच तो अब्जाधीश कसा झाला, झाला हा ही संशोधनाचा विषय आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आपल्यावर कोणी हात टाकू नये यासाठी रवी अग्रवाल याने पोलिस अधिकारी व नेत्यांना डब्ब्यात बंद केले होते. अनेक अधिकाऱ्यांशी 'हात'मिळवणी करून त्याने डब्बा बाजारावर वर्चस्व मिळविले. पोलिसांना 'संपूर्ण' मदत करण्यातही त्याचा एल सेव्हन ग्रुप अग्रेसर आहे. पोलिस जिमखानापासून ते विमानतळापर्यंत त्याचे कठडे लागलेले आहेत. यावरून त्याचे पोलिस विभागातील वर्चस्व दिसून येते.
सूर्यनगरातील पेन्ट हाऊसमध्ये असायची गर्दी
रवी अग्रवाल याचे सूर्यनगर भागात पेन्टहाऊस आहे. येथे लाल व पिवळ्या दिव्यांच्या गाड्यांची नेहमीच गर्दी होत असे. रात्री उशिरापर्यंत येथे पार्टी चालायची. रवी अग्रवाल याच्यावर अचानक पोलिसांनी हात कसा घातला, हा आता या भागात चर्चेचा विषय झाला आहे. पोलिस आता आपल्याच माणसांचा कसा शोध घेतील, अशी कुजबूजही परिसरात आहे.
सॉफ्टवेअर कंपनीही...
एल सेव्हन ग्रुप नावाची रवी अग्रवाल याची सॉफ्टवेअर कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून त्याने पोलिस विभागाला अनेक सॉफ्टवेअर्स दिले आहेत. याच कंपनीच्या आड तो डब्बा बाजार चालवीत होता, अशीही माहिती आता पुढे येत आहे.
एअरपोर्टवर व्हीआयपी ट्रीटमेंट
रवी अग्रवाल याचा एल सेव्हन ग्रुप नागपूरपासून ते मुंबईपर्यंत 'फेमस' आहे. रवी अग्रवाल याला विमानतळावर नेहमी व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात येत होती, असेही सांगण्यात येते. तो नेहमी दुबईवारी करतो, असेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
कठड्यांवर अतिक्रमण
शहरातील अन्य संस्थांनी वाहतूक शाखेल्या दिलेल्या कठड्यांवर एल सेव्हन ग्रुप व छत्तरपूर फार्म्स या दोन नावाने रवी अग्रवाल याने अतिक्रमण केले आहे. वाहतूक शाखेनेही त्याला कशी परवानगी दिली, हे गुलदस्त्यात आहे. अन्य संस्थांचे कठडे घेऊन त्याजागी आपल्या कंपनीचे कठडे त्याने वाहतूक शाखेला दिले, असा अजब प्रकारही समोर आला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट