महाराष्ट्राच्या उर्वरित भागापेक्षा विदर्भात वने आणि तलावांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे येथे गोड्या पाण्याची मासेमारी आणि दुग्धोत्पादनाला प्रचंड वाव आहे. नागपुरात मत्स्य व पशुविज्ञान विद्यापीठ (माफसू) आल्यानंतर याला चालना मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे घडलेच नाही. त्यामुळे हे माफसू असून नसून उपयोग काय, असा थेट हल्ला चढवत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी माफसूची चांगलीच खरडपट्टी केली.
अॅग्रोव्हिजन फाऊंडेशन आणि नागपूर पशुवैद्यक कॉलेजच्यावतीने शनिवारी 'विदर्भातील मत्स्यव्यवसाय विकास' या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी गडकरी बोलत होते. व्यासपीठावर रामटेकचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, आमदार डॉ. आशिष देशमुख, सुधीर पारवे, सुनील केदार, सहकुलगुरू एम. जी. जोशी, कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू सी. डी. मायी, जि. प. अध्यक्ष निशा सावरकर प्रामुख्याने उपस्थित होत्या. माफसूच्या ढिसाळ नियोजनाचा क्लास घेत गडकरी म्हणाले, 'विदर्भात पशुधनाची संख्या मोठी आहे. सोबतच तलावांचीदेखील संख्या राज्यात सर्वाधिक आहे. तरीही दुग्ध व मत्स्यव्यवसाय विकसित होत नसेल तर हे माफसूचे अपयश आहे. येणाऱ्या काळात केंद्रसरकार राज्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणार आहे. नागपुरात एक लाख कोटी रुपये खर्चून नाग नदीत जलवाहतूक करण्याची योजना आहे. विदर्भात ७० हजार हेक्टरवर जलशेती करता येऊ शकते. यातून पाच लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. वास्तविक संशोधने ही मत्स्य व पशुपालकांपर्यंत पोहोचली पाहिजेत. ती पोहोचत नसतील तर नागपुरात मत्स्य व पशुविज्ञान विद्यापीठ असून नसून उपयोग काय? त्याची गरजच नाही, असे म्हणावे लागेल.'
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट