स्वच्छ भारत अभियानअंतर्गत शनिवारी मनपा मुख्यालयात स्वच्छता करीत असताना स्थायी समिती समोरिल परिसरात मोठा पाणबोड्या साप आढळला.यामुळे काही काळ खळबळ उडाली.त्यानंतर लागलीच अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धावपळ करीत सर्पमित्र रोहित झमणावदकर यांना बोलावून पडकण्यात आला. त्यानंतर ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आले.
२ ऑक्टोबर गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला मनपाच्या मुख्यालयासह सर्व झोन कार्यालय, शाळांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. हे अभियान राबवित असतानाच मनपाच्या मुख्यालयात महिलांसाठी असलेल्या ई-शौचालयाजवळील जागेत हा साप आढळला. अग्निशमन विभागाचे केशव कोठे यांनी पडकलेला साप नंतर आयुक्तांना दाखविला. सकाळी ७ ते ९ या वेळेत महापौर प्रवीण दटके, आयुक्त श्रावण हर्डीकर,अतिरीक्त आयुक्त डॉ.रामनाथ सोनवणे यांनीही स्वत: हातात झाडू घेवून श्रमदानास प्रारंभ केला व स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.
मुख्यालय परिसर व मुख्य इमारतीच्या वरच्या माळयावरील तुटलेले लाकडी व लोखंडी फर्निचर साहित्य, प्लास्टिक व उपयोगात नसलेले कुलर व उपयोगात नसलेल्या वस्तू तसेच इतर साहित्य हटविण्यात आले. जे लाकडाचे फर्निचर दुरूस्त करून पुन्हा वापरात आणता येते त्याची दुरूस्ती करण्यात येणार आहे. तर जे साहित्य निकामी असेल त्यांचे मूल्यांकन करून भंगार विकण्याबाबत निविदा काढून व साहित्य कोणत्याच कामाचे नाही त्याची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. महापौर दटके, आयुक्त हर्डीकर, अतिरीक्त आयुक्त डॉ. सोनवणे , उपायुक्त रवींद्र देवतळे यांनी मुख्यालयात सर्व विभाग प्रमुखांच्या कार्यालयाची प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छतेचा आढावा घेतला. महापौर दटके यांनी पत्रकार कक्षाचीही स्वच्छता केली. महापौरांनी स्वच्छतेबाबत काही सूचना केल्या. आयुक्तांनीही प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी कर्यालय स्वच्छ व निटनेटके व सुंदर ठेवण्याकरिता कर्तव्य भावनेतून कार्य करावे असे आवाहन केले.कार्यालयाच्या भिंतीवर थुंकू नये व भिंती खराब करू नये अशा सूचना फलक लावण्यास सांगितले.
अभियानात सहायक आयुक्त प्रकाश वराडे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, नगरयंत्री मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता राजेश भुतकर, अनिरुध्द चौग्कर परिवहन अधिकारी शिवाजी जगताप, महेश गुप्ता, स्थावर अधिकारी आर.एस.भुते, डी.डी.जांभूळकर,निगम अधीक्षक फागो उके, पशुचिकिस्ता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले,सहायक अभियंता मनाकर, सहायक अग्निशमन अधिकारी सुनील राऊत, राजू भांडारकर, जितेंद्र तोमर व सर्व विभागाचे विभागप्रमुख व बहुसंख्य अधिकरी व कर्मचाऱ्यांनी य अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट