वन विभाग आणि इतर लोक वन्यजीव संवर्धनासाठी काम करीत आहेत. मात्र, न्यायपालिका आणि विद्यार्थी हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. विशेषतः न्यायपालिकेची भूमिका ही वन्यजीवांच्या हिताचीच राहिली आहे. त्यामुळे या दोन्ही घटकांकडून वन विभागाला मोठ्या अपेक्षा आहेत, असे मत राज्याच्या वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक भगवान यांनी व्यक्त केले.
वन्यजीव सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सेमिनरी हिल्स येथे वन सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनबलप्रमुख सर्जन भगत उपस्थित होते. महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुरेश गैरोला यांच्यासह वन विभागाचे अनेक वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. वनबलप्रमुख भगत यांनीदेखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. वन्यजीव सप्ताहामध्ये लोकांचा सहभाग वाढला पाहिजे तसेच विविध स्पर्धांसाठी दिली जाणारे बक्षीसेदेखील जास्त रकमेची असायला हवी. नागपुरात होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती ठेवली जाते. मात्र, राज्यभरात या सप्ताहात विविध कार्यक्रम होत असतात. या सर्व कार्यक्रमांच्या नोंदी जपून ठेवल्या गेल्या पाहिजे व त्या सर्वांसमोर आणल्या पाहिजेत असेही ते म्हणाले.
यावेळी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने सुरू करण्यात येत असलेल्या पर्यटक हेल्पलाइनचे उद्घाटनही करण्यात आले. या शिवाय, चंद्रपूर येथील वाइल्ड कॅप्चर्स संस्थेने तयार केलेल्या ‘ताडोबा’ या मोबाइल अॅपचेही उद्घाटन भगत यांनी केले. ताडोबा येथे येणाऱ्या पर्यटकांना लाभ व्हावा यादृष्टीने हे अॅप तयार करण्यात आले आहे. सामाजिक वनिकरण विभागाचे उपसंचालक किशोर मिश्रीकोटकर यांनी आभार मानले.
व्यवस्थापन आराखड्यांना व्हावा संशोधनाचा लाभ
दरवर्षी वन विभागात व्यवस्थापन आराखडे तयार होतात आणि सर्व प्रदेशांसाठी ते सारख्याच प्रकार बनविले जातात. मागील वर्षीची माहितीच थोडेफार बदल करून त्यात समाविष्ट केली असल्यासारखे हे आराखडे असतात. मात्र, प्रत्येक वनक्षेत्रात विविध संशोधने किंवा अभ्यास होत असतात. या अभ्यासातून पुढे येणाऱ्या माहितीचा उपयोग व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी केला जावा, असे मत डॉ. गैरोला यांनी मांडले.
वाघाशिवाय इतरही प्रजातींकडे लक्ष देणे आणि नागरिकांचा सहभाग असलेली व्यासपीठे तयार करून वन्यजीव संवर्धनासाठी त्यांचा उपयोग करणे हे मुद्देदेखील त्यांनी आपल्या भाषणादरम्यान मांडले. वन विभागाचे विविध कायदे किंवा आदेश हे स्थानिकांचा सहभाग मिळेल या दृष्टीने असायला हवा. स्थानिकांच्या सहभागातूनच वन्यजीव संवर्धन अधिक चांगल्या प्रकारे होणार आहे. त्यामुळे, केवळ एखादा अधिकारी किंवा संस्था यांनी ते करून उपयोगाचे नाही. त्याऐवजी, हे प्रयत्न विभागाच्या स्तरावर अधिक सुनियोजित पद्धतीने व्हावे, असेही डॉ. गैरोला म्हणाले.
विद्यार्थ्यांनी घेतला पक्षी निरीक्षणाचा आनंद
नागपुरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी अंबाझरी तलाव परिसरात पक्षीनिरीक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शहरातील वेगवेगळ्या शाळांमधील विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. नागपूरचे उपवनसंरक्षक मल्लिकार्जुन रेड्डी, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते तसेच इतरांनी यावेळी विद्यार्थ्यांना विविध पक्ष्यांबद्दल विस्तृत माहिती दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट