पाच वर्षांच्या कार्यकाळात गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील महाविद्यालयांनी केलेली प्रगती अभिनंदनीय आहे. विद्यापीठाच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी कॉलेजेसनी सर्वंकष प्रयत्न करून विद्यार्थ्यांचे भावी जीवन उज्ज्वल करावे. पुरस्काराचे मानकरी व्हावे, असा आशावाद गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठाचा पाचवा वर्धापन दिन कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सत्कारमूर्ती डॉ. प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे, आमदार अनिल सोले, परीक्षा नियंत्रक जे. व्ही. दडवे, प्राचार्य डॉ. राजेश चंदनपाट, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रंचित सावकार पोरेड्डीवार, प्राचार्य डॉ. डी. जी. म्हशाखेत्री, प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
आमदार सोले म्हणाले, डॉ. प्रकाश आमटे यांचे कार्य जीवनव्रती असून स्पृहनीय आहे. विद्यापीठ हे फक्त ज्ञानदान देणारेच नाही तर युवकांना योग्य दिशेत नेऊन त्यांचे अस्तित्व घडविणारे बनले आहेत. विद्यापीठाने सामाजिक जाणीवेबरोबरच प्रत्येक व्यक्तींच्या कार्यप्रणालीला समायोचित समजून त्यांना पुरस्कृत करणे व भावी काळात त्यांना नवीन स्फूर्ती प्रदान व्हावी हा दृष्टीकोन बाळगावा. सामाजिक उपक्रमशिलता, प्रतिभासंपन्नता, जिद्दीने काम करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचे कार्य विद्यार्थी करीत आहेत. ही एक त्याचीच पावती आहे, असेही सोले म्हणाले. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांचा विविध पुरस्काराने गौरव करण्यात आला.
प्रास्ताविक कुलसचिव डॉ. श्रीराम रोकडे यांनी केले. संचालन प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर तर आभार कुलसचिव डॉ. श्रीराम रोकडे यांनी मानले.
आम्ही फक्त निमित्तमात्र : डॉ. प्रकाश आमटे
बाबांनी पिकनिकच्या उद्देशाने १९७०साली गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर आणले आणि सीमारेषाच बदलून गेली. हे सर्व बाबांचे कर्तव्य व प्रयत्न आहेत. आम्ही फक्त त्यांची ही प्रेरणा घेऊन परिश्रम, सहकार्य व आत्मविश्वासाने आदिवासी जनजीवनात आनंददायी उमेद निर्माण केली. त्यांचा आनंद म्हणजेच आमच्या जीवनातील आनंद आहे. हे एक निमित्तमात्र आहे. आयुष्यामध्ये साधेपणा जपला पण भरपूर काही मिळाले. आम्ही इथेच थांबणार नाही तर बाबांच्या प्रत्येक प्रेरणादायी संकल्पनांना उच्च शिखरावर नेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट