उपराजधानीत उघडकीस आलेल्या अडीच हजार कोटींपेक्षा अधिकच्या डब्बा ट्रेडिंगमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. गुन्हेशाखेच्या आर्थिक विभागासह सेबीसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची या प्रकरणाच्या तपासासाठी मदत घेण्यात येत असतानाच या डब्ब्यातील पैसा हा खासगी लॉकरमध्ये असल्याची खळबजनक माहिती समोर आली आहे.
इतवारी परिसरातील दहा खासगी लॉकर्स आहेत. दुसऱ्याच्या नावे घेतलेल्या या लॉकरमध्ये डब्बा ट्रेडिंगमधून मिळालेली रोख ठेवण्यात येते. अद्यापही ती लॉकरमध्येच आहेत. दोन-दोन महिने हे लॉकर्स उघडण्यात येत नाहीत. काही लॉकरचा मूळ मालक कोण आहे याचा पत्ता लॉकर संचालकांना नाही. त्यामुळे गुन्हेशाखेच्या आर्थिक विभागाने या लॉकरची झाडाझडती घेतल्यास अनेक तथ्य समोर येण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. काही महिन्यांपूर्वी इतवारीतील दोन खासगी लॉकर चर्चेत आले होते. सुरुवातीला याचा तपास झाला. मात्र, नंतर प्रकरण थंडबस्त्यात गेले, असेही कळते.
दरम्यान, सूत्रधार व एल सेव्हन ग्रुपचा संचालक रवी अग्रवाल हा विदेशात आहे. रवीसह दिनेश भवरालाल सारडा, कन्हय्या ऊर्फ कन्नी रामचंद्र थावराणी, सचिन ठाकूरलाल अग्रवाल, दिनेश चंदुलाल गोकलानी, विनय श्रीप्रकाश अग्रवाल, अंकित ओमप्रकाश मालू, आशिष मुकुंद बजाज, अभिषेक बजाज अद्यापही पसार असून, पोलिसांचे पथक त्यांचा शोध घेत आहेत.
सखोल तपास : डीजी डब्बा ट्रेडिंग हा मोठा आर्थिक घोटाळा आहे. सेबी व अन्य केंद्रीय तपास संस्थांच्या मदतीने पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करतील. या प्रकरणातील दोषींविरुद्ध कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा मिळावी, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. या प्रकरणात कोणताही दबाव नाही. सेबी व अन्य एजन्सीकडून सहकार्य घेण्यात येत आहे, असे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट