इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बुब्बुळ प्रत्यारोपण युनिटमध्ये पाच वर्षांपासून मिठाचा खडा घालण्याचे काम वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग करीत होते. यावरून पालकमंत्र्यांनी गेल्या महिन्यात बोलावलेल्या अभ्यागत मंडळाच्या बैठकीत बरेच वादंग झाले. त्यानंतर हा मुद्दा मंत्रिमंडळासमक्ष गेल्यानंतर अखेर या युनिटला मंजुरी देण्यात आली. उशिरा का होईना प्रशासनाला जाग आल्याने आता बुब्बुळांच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो रुग्णांच्या डोळ्यात प्रकाश किरण पेरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यात गेल्या वर्षभराच्या काळात १५४७ जणांच्या बुब्बुळांचे प्रत्यारोपण करण्यात आले. त्यापैकी १०० बुब्बुळ एकट्या नागपुरात झाले. एकट्या मेडिकलमधील नेत्ररोग विभागाने यातील ३२ जणांना दृष्टी दिली. मात्र, असे युनिट मेयोत नसल्याने शेकडो रुग्ण प्रतीक्षा यादीत होते. त्यात अलीकडेच सरकारने राज्यभर अवयवदान जागृती अभियान राबविले. त्यासाठी ४ कोटी रुपयांचा खर्चही केला. या काळातच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मेयोत अभ्यागत मंडळाची बैठक घेतली. तीत या बुब्बुळ प्रत्यारोपण युनिटचे काम रखडल्यावरून वादंग झाले. त्यांनी ही बाब वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला.
विशेष म्हणजे, मेयोच्या बुब्बुळ प्रत्यारोपणासाठी सर्वांत प्रथम २०१२ मध्ये प्रस्ताव पाठविण्यात आला. तेव्हापासून आजवर वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने काहीही केले नाही. अखेर उशीरा का होईना या बुब्बुळ प्रत्यारोपण युनिटला सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील शेकडो रुग्णांना लवकरच दृष्टी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट