'यूपीए सरकारच्या काळात चार वेळा सर्जिकल स्ट्राईक झाले, मात्र त्याचा कधी गवगवा केला नाही', अशी माहिती देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी सर्जिकल स्ट्राइकबाबतच्या भाजप नेत्यांच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडले आहे. नागपुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते.
मनमोहन सिंग पंतप्रधान असताना चार वेळा सर्जिकल स्ट्राइक झाले. देशाच्या सीमा ओलांडून दहशतवाद्यांना धडा शिकवला. मात्र त्यावेळी जाहीर वाच्यता कुणी केली नाही. सध्याच्या नेत्यांमध्ये समज नाही. भाजप नेते तर स्वत: पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राइक केल्याचा आव आणत आहेत असा टोलाही पवार यांनी भाजप नेत्यांना लगावला.
सर्जिकल स्ट्राइकच्या मुद्द्यावर बोलताना पवार म्हणाले, 'उरीचा हल्ला मोठा धक्का होता. देभभरात बदल्याची भावना होती. त्याला उत्तर देण्याची गरज होती. सैन्याने दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले. यात राजकारण न आणता आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. रशियानेही या कारवाईचे समर्थन केले. परंतु एकच गोष्ट माझ्या सारख्याला खटकते. या घटनेचा गवगवा व्हायला नको होता.'
अॅट्रॉसिटी कायदा हवाच!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी इतर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला. मराठा समाजाकडून होत असलेल्या अॅट्रॉसिटी कायद्याबाबतच्या मागणीवर बोलताना पवार म्हणाले, की आज राज्यात ठिकठिकाणी मराठा क्रांती मोर्चे निघत आहेत. त्यात आरक्षणाची मागणी होत आहे, तशी अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याचीही मागणी पुढे येत आहे. मात्र अॅट्रॉसिटी कायदा रद्द करणे योग्य नव्हे, हा कायदा हवाच, मात्र त्याचा गैरवापर रोखणे आवश्यक आहे.
पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
मराठा क्रांती मोर्चा हा विस्थापितांचा प्रस्थापितांविरूद्धचा मोर्चा आहे असे मुख्यमंत्री म्हणतात, मात्र मुख्यमंत्री ज्यांना विस्थापित म्हणतात ते आज कुठेच पदावर नाहीत. मात्र पाच वर्षांनी हेच विस्थापित पदावर येऊ शकतात हे मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावे अशा शब्दात पवार यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. ज्या शेतकऱ्यांचे सोन्यासारखे पीक पावसाने नष्ट होते, असा शेतकरी विस्थापित होतो आणि हे मोर्चे त्यांचेच आहेत याकडेही पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
सत्तेबद्दल लोकांना विश्वास असेल, तर लोक रस्त्यावर उतरत नाही. मात्र, जिथे विश्वासच शिल्लक नसतो तिथे लोक रस्त्यावर उतरतात. या सरकारबद्दल नागरिकांना केवळ दोनच वर्षात कळून चुकले आहे, की हे सरकार आपले प्रश्न सोडवू शकत नाहीत. त्यामुळेच ते रस्त्यावर उतरले आहेत अशी टीकाही पवार यांनी केली आहे
५० टक्क्यांहून जास्त आरक्षण देता येते
पवार यांनी आपल्या भाषणातून आरक्षणाच्या मुद्द्यालाही हात घातला. ते म्हणाले, की लोक म्हणतात ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही. मात्र तामिळनाडूमध्ये तर ५० टक्केपेक्षा अधिक आरक्षण आहे. याबाबत केंद्र सरकारसोबत चर्चा करायला हवी असेही पवार म्हणाले.
कोपर्डी बलात्काराचे आरोपपत्र का दाखल केले नाही?
कोपर्डी बलात्कारप्रकरणाचं आरोपपत्र एक महिन्यात दाखल करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. याची आठवण करुन देत पवार यांनी ' या घटनेला तीन महिले होत आले असतानाही अद्याप हे आरोपपत्र का दाखल झाले नाही' असा सवाल उपस्थित केला आहे.
वेगळ्या विदर्भाला विरोध नाही!
यावेळी पवार यांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर आपले मत स्पष्ट केले. वेगळ्या विदर्भाच्या विषयावर विदर्भातील लोकांची इच्छा महत्वाची आहे. विदर्भातील लोकांची जर वेगळ्या विदर्भाची मागणी असेल, तर वेगळ्या विदर्भाला आमचा विरोध नाही असे म्हणत पवार यांनी आजच्या भाषणातून वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यालाही हात घातला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट