शस्त्रक्रियेच्या वेळी साधारण कपडे परिधान केले जात नाहीत. त्यासाठी निर्जंतुकीकरण केलेले कपडे वापरावे लागतात. जेणेकरून, रुग्णाला शल्यक्रियेदरम्यान जंतुसंसर्ग होऊ नये, ही त्यामागची भावना असते. मात्र, सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला मेडिकलच्या लॉन्ड्रीकडून सहकार्य मिळत नसल्याने शस्त्रक्रियेत खोळंबा निर्माण झाल्याने नियोजित शस्त्रक्रियादेखील पुढे ढकलाव्या लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील रुग्णांचे कपडे धुण्यास मेडिकलच्या लॉन्ड्रीने चक्क नकार दिल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. ज्या रुग्णांच्या भरवशावर येथील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचे वेतन निघते त्या रुग्णांच्या जीवाशीच असा संतापजनक खेळ सुरू आहे. नुकतेच दोन महिन्यांपूर्वी अटेंडंट आणि सफाई कामगारांनी बुट्टी मारल्याने शस्त्रक्रिया झाल्या नसल्याचे ताजे उदाहरण असताना पुन्हा केवळ लॉन्ड्रीमध्ये कपडे न धुतल्यामुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागत आहेत.
सुपर असो वा मेडिकल गरीबांच्या विविध आजारांवर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतूनच शस्त्रक्रिया होतात. मात्र लॉन्ड्रीतील कर्मचारी, अटेन्डंट, सफाईगार यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे मेडिकल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात येतात. गरिबांसाठी हृदय, मेंदू आणि किडनी यांसारख्या आजारांवर वरदान ठरत असलेल्या सुपरमध्येही रुग्णांना असे वेठीस धरले जात आहे. सुपरमध्ये दर दिवसाला हृदयावरील दोन बायपास, १० अॅन्जिओग्राफी, पाच अॅन्जिओप्लास्टी, किडनी, मेंदू तसेच इतरही शस्त्रक्रिया होतात. गेल्या पंधरा दिवसांपासून सुपर स्पेशालिटीतील कपडे धुण्यास लॉँड्रीतील कर्मचाऱ्यांनी चक्क नकार देत आहेत. त्यामुळे सुपरसमोर प्रश्नचिन्ह उभे ठाकले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. जगदीश हेडावू यांनी सुपर प्रशासनाला पत्र लिहून दोन अतिरिक्त कर्मचारी देण्याची सूचना केली. परंतु, अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी उपलब्ध कर्मचाऱ्यांमध्ये कपडे धुण्यासंदर्भात सूचना केल्या. दहा ते बारा कर्मचारी येथे कार्यरत आहेत. तरीदेखील सुपरचे कपडे धुण्यास नकार दिल्याने शस्त्रक्रियांना थांबा लागल्या आहेत.
ट्रॉमातील कपड्यांचा भार
सुपर, टीबी तसेच मेडिकल या रुग्णालयांतील कपडे धुण्याचे काम मेडिकलमधील लॉन्ड्रीत सुरू आहे. त्यात ट्रॉमा केअर युनिटमधील रुग्णांचे कपडे धुण्याचा अतिरिक्त भार वाढला. यामुळे येथील कर्मचाऱ्यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील रुग्णांचे कपडे धुण्यास नकार दिला. यामुळे सुपरमध्ये खळबळ उडाली आहे. कपडे न धुतल्यामुळे निर्जंतुकीकरण करता आले नाही. यामुळे शस्त्रक्रियांना थांबा लागला असल्याची माहिती पुढे आली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट