जिल्ह्यातील शेतकरी सभासदांना यंदाच्या खरीप हंगामासाठी पीककर्ज मिळणे सुलभ उपलब्ध व्हावे, यासाठी तालुकास्तरावर स्थापन झालेल्या पीककर्ज वाटप समन्वय समितीचे काम सुरू झाले आहे. येत्या २४ व ३१ मे रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ यावेळेत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत पीककर्ज मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सांगितले.
ही मदत केंद्रे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील तहसील कार्यालयांत असून दर आठवड्यात मंगळवारी व शुक्रवारी दुपारी ३ वाजतापासून सुरू होतील. पीककर्ज वाटप मदत केंद्रातील नोंदणीकृत अथवा मागणी करणाऱ्या गरजू शेतकऱ्यास सातबारा, ८अ, चतुर्सीमा नकाशा व इतर आवश्यक दस्ताऐवज उपलब्ध करून देण्यासाठी तलाठी व संबंधितांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
नव्याने मिळणार कर्ज राष्ट्रीयीकृत व अन्य व्यापारी बँकांकडून मागीलवर्षी खरीप कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जाचे रूपांतर करून चालूवर्षी नव्याने पीककर्ज वाटप करण्यात येणार आहे. ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी घोषित झालेल्या १ हजार १७१ गावांतील शेतकऱ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या बँक शाखा व्यवस्थापक, बँक अधिकारी यांचेकडे पुनर्गठनाबाबत संमतीपत्र भरून पीककर्ज मदत केंद्रात संबंधित शाखा व्यवस्थापकाकडे सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट